हवेलीत ११ गुंठे शेतजमिनींच्या दस्तनोंदणी सुरू करावीत:पै.संदिप भोंडवे....
-[प्रशासनाच्या भुमिकेविरोधात थेट पै.भोंडवेंचा उपोषणाचा इशारा:नोंदणी महानिरीक्षकांना पत्रव्यवहार]-
सुनिल भंडारे पाटील
राज्यात सुरु असलेली किमान ११ गुंठे शेतजमिनींची खरेदी दस्तनोंदणी हवेली तालुक्यातही सुरू न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा हवेली तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष पै. संदीप भोंडवे यांनी नोंदणी महानिरीक्षक श्रवण हर्डीकर यांना पत्र पाठवून दिला आहे.सत्ताधारी पक्षाच्या तालुकाध्यक्षानेच प्रशासनाच्या भुमिकेविरोधात थेट उपोषणाचा इशारा देत दंड थोपटल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.
याबाबत भोंडवे यांनी नोंदणी महानिरीक्षकांना पाठविलेल्या पत्रानुसार, दि.१२ जुलै २०२१ रोजी एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या नावावर शेतजमिनीचे ११ गुंठे क्षेत्राचे खरेदीदस्त नोंदविण्यास मनाई केलेले परीपत्रक नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रकांनी काढले होते.मात्र या परिपत्रकाव्दारे जारी केलेला आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने ५ मे २०२२ रोजी रद्द केलेला आहे
संभाजीनगर खंडपीठाच्या निर्णयानंतर संपुर्ण महाराष्ट्रात शेतजमिनींचे ११ गुंठयाची खरेदीदस्त नोंदणी सुरू करण्यात आली आहे.कायदा व नियम सर्वांनाच सारखे असताना फेब्रुवारी २०२२ पासुन हवेली तालुक्यातील शेतजमिनीचे ११ गुंठ्याची खरेदीदस्त नोंदणी मात्र अद्यापही बंदच आहे.दरम्यान पुणे शहर अथवा शहरालगतच्या बांधकाम व्यवसायिकांच्या हितासाठी केवळ पीएमआरडीचे कारण सांगुन हवेलीत सध्या बंद असलेली ही खरेदीदस्त नोंदणी अतिरीक्त खर्च घेवून मात्र सहज शक्य होत असल्याचा आरोपही संदीप भोंडवे यांनी केला आहे. तसेच पुणे जिल्हात ८६७ गावे पीएमआरडी मध्ये समाविष्ट असताना फक्त हवेली तालुक्यातील ६० ते ७० गावांनाच हा नियम शासनाने लागु का केला ? असाही सर्वसामान्यांचा प्रश्न असल्याचे भोंडवे यांनी सांगितले.
या सर्व बाबींची दखल घेवून ११ गुंठे शेतीक्षेत्राची खरेदीदस्त नोंदणी हवेली तालुक्यात तात्काळ सुरू करावी, तसेच ११ गुंठे शेतीक्षेत्र एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या नावावर नोंदविणे बेकायदेशीर असल्यास असे दस्त नोंदविणाऱ्या पुणे जिल्हासह राज्यातील नोंदणी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर चौकशीसह कठोर कारवाई करावी, अन्यथा येत्या २५ ऑगस्ट २०२२ रोजी नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाच्या बाहेर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल,असा इशारा भोंडवें यांनी दिला आहे.