अनिकेत मुळीक लोणी काळभोर
खडकवासला धरणात मुसळधार पाऊस सुरू असून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. दरम्यान, नांदेड-शिवणे पुलावरुन दोन तरुण वाहून गेल्याची घटना घडली. त्यापैकी एक तरुण बचावला असून पाण्यात वाहून गेलेल्या दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.
पुलाच्या खांबाला घट्ट पकडून ठेवल्याने तो बचावला –
निखिल कौशिक असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा बरोबर असलेला आशिष देवीदास राठोड याने पुलाच्या कठड्याला घट्ट धरून ठेवल्याने तो बचावला. निखिल आणि आशिष नांदेड-शिवणे पुलावरुन जात होते. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत असल्याने नांदेड-शिवणे पूल पाण्याखाली गेला आहे.
पूल ओलांडत असताना पाण्याच्या प्रवाहात निखिल आणि आशिष वाहून जात होते. त्या वेळी आशिषने पुलाच्या खांबाला घट्ट पकडून ठेवल्याने तो बचावला. शिवणे गावातील रहिवासी विद्याधर दळवी, महेश कांबळे, राज वाल्मिकी यांनी दोर टाकून आशिषला बाहेर काढले. तर, वाहून गेलेल्या निखिलचा अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध घेतला. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागला नाही.