सुनील भंडारे पाटील
हवेलीचे उपविभागीय अधिकारी संजय आसवले यांनी शासनाने घालून दिलेल्या नियम व अटी यांचे उल्लंघन करून सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांना नाहक त्रास देण्याची व त्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचे धोरण राबवले असल्याचा आरोप करीत त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप सातव यांनी विभागीय आयुक्त सौरभराव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
संदीप सातव यांनी सांगितले की रिंग रोड बाधित क्षेत्रामधील शेतकऱ्यांना त्यांच्या जागेचे मूल्यांकन करून त्या जागेचा योग्य मोबदला देण्यासाठी आज अखेरपर्यंत अनेक वेळा हेलपाटे मारावे लागत आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर असणाऱ्या दोन ते तीन एजंटामार्फत टक्केवारी घेवून तातडीने पैशांचे वाटप होत आहे. अनेक जणांकडून टक्केवारी आज अखेर पर्यंत पैशांचे वाटप करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांकडून टक्केवारीचे पैसे मिळाले त्यांचे वाटप लवकर व ज्या शेतकऱ्यांकडून टक्केवारी मिळाली नाही अशा शेतकऱ्यांना हेलपाटे मारून मानसिक त्रास दिला जात आहे.
रिंगरोड बाधित क्षेत्रामध्ये पैसे वाटप करण्याच्या प्रक्रिया नावापुरत्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी ठेवल्या आहेत. याबाबतची चौकशी होणे देखील गरजेचे आहे. जागा जमिनीच्या संदर्भातील वाद-विवादांच्या बाबतीत अथवा जमिनीच्या सातबारा वरील नोंदणी असणाऱ्या विविध न्यायनिवडयांबाबत हेच दोन ते तीन एजंट निकाल संबंधितांना दाखवून त्यांच्याकडून टक्केवारी घेऊन तातडीने उपविभागीय अधिकाऱ्यांची सही घेतली जाते आणि निकाल हस्तांतरित करू लागले आहेत. अत्यंत गंभीर प्रकार हवेली उपविभागीय अधिकाऱ्यांच्या समोरून त्यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचला आहे.
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या गेल्या सहा महिन्याच्या बेकायदेशीर कारभार त्यांच्या कार्यालयाच्या बाहेरील व आतील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून स्पष्ट होऊ शकतो. त्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून संजय असवले यांनी कार्यालयीन आदेश तसेच रिंगरोड बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना वाटप केलेल्या रक्कमेंबाबत अनागोंदी कारभार स्पष्ट होऊ शकतो. यासाठी तातडीने दप्तर तपासणी व विभागीय स्तरावर चौकशी समिती नेमून कामकाज पडताळणी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अन्यथा सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपविभागीय कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संदीप सातव यांनी दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील निवेदन सातव यांनी दिले आहे.
जिल्हाधिकारी मार्फत योग्य ती चौकशी करण्यात येणार असून चौकशीनंतर हवेलीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांवर पुढील कारवाई करण्यात येईल. - रामचंद्र शिंदे (महसूल उपायुक्त, विभागीय कार्यालय पुणे