काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदुर अंतर्गत जबरदस्त प्रहार करत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. देशभक्तीचा जागर करत, भारतीय लष्कराच्या वीर जवानांच्या शौर्याला मानवंदना अर्पण करणारी भव्य तिरंगा रॅली लोणीकंद येथे रविवारी (१८ मे २०२५) उत्साहात संपन्न झाली. "ऑपरेशन सिंदूर" या राष्ट्रीय अभियानाच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आलेली ही रॅली सकाळी ९ वाजता सोमेश्वर पतसंस्था येथून सुरू होऊन ग्रामपंचायत चौकात राष्ट्रगीताने समारोपास आली.
या रॅलीचे नेतृत्व पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष (उत्तर) प्रदीप विद्याधर कंद यांनी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते उत्तम भोंडवे, माजी जि.प. सदस्य शंकर भूमकर, तंटामुक्ती अध्यक्ष संजय कंद, माजी सभापती नारायण कंद, संदीप भोंडवे, रवींद्र कंद, कल्पेश जाचक, प्रदीप सातव गणेश चौधरी,आदी मान्यवरांसह गावातील आजी-माजी पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला भगिनी मोठ्या आणि जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील अनेक शहरांवर अचुक क्षेपणास्र हल्ला करीत अतिरेकी तळ उध्वस्त करून भारतीय लष्कराने व हवाई दलाने आपले सामर्थ्य संपुर्ण जगाला दाखवून दिले आहे.या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे ती कोणत्याही पक्षापुरती मर्यादित न राहता सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांसाठी खुली होती. हातात तिरंगा आणि मुखातून 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्' अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. 'आरंभ है प्रचंड' या घोषणेसह निघालेली ही रॅली केवळ मिरवणूक नसून, भारतीय सैन्याच्या शौर्य व बलिदानाचा सन्मान करणारा, राष्ट्रीय एकतेचा जल्लोष ठरली.
या रॅलीतून युवकांमध्ये देशप्रेम जागवण्याचा आणि सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न झाला. लोणीकंद ग्रामस्थांच्या एकजूटीतून भरवलेली ही तिरंगा रॅली प्रेरणादायी ठरली, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.