वाघोली प्रतिनिधी
वाघोली (तालुका हवेली) येथील वाघेश्वर नगर (गोरे वस्ती) रस्त्यालगत गेली अनेक वर्षांपासून पोलीस प्रशासनाला न जुमानता खुलेआम होत गांजा विक्री होत आहे. त्यामुळे येथील रहिवाशी, महिला, शाळकरी मुलींना दैनंदिन मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या पाठबळामुळे दिवसेंदिवस गुंडगिरी वाढत चालली आहे. महिला, मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून तात्काळ गांजा विक्रेत्यांसह गुंडप्रवृतीच्या ग्राहकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसैनिक (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सागर गोरे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री व पुणे पोलीस आयुक्तांसह लोणीकंद पोलीस स्टेशनला लेखी निवेदनाद्वारे केली आहे. गांजा विक्रेत्यांवर कारवाई न झाल्यास कुटुंबासह उपोषण करण्यात येईल अशा इशारा गोरे यांनी दिला आहे.
वाघोलीतील वाघेश्वर नगर (गोरेवस्ती) रोडवर तसेच कचरा डेपो समोरील बाजूस उभे राहून गांजा विक्रेत्यांकडून बिनधास्त खुलेआम गांजा विक्री केली जाते. असंख्य उच्चशिक्षित तरुण नशेच्या आहारी जात आहेत. अनेक महिलांचे संसार उद्धवस्त होत आहेत. गांजा खरेदीसाठी येणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या ग्राहकांकडून महिला, मुलींची छेडछडीचे प्रकार सुद्धा घडले आहेत. येथील रहिवाशांना गांजा विक्रेते व गुंड ग्राहकांकडून असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
शाळकरी मुला-मुलींच्या मनावर दुष्परिणाम होऊन त्यांचा अभ्यास करण्याकडील कल गुंड प्रवृत्तीच्या दिशेने जात आहे. वेळीच गांजा विक्रेते, मद्य विक्रते यांच्यावर कारवाई केली नाहीतर गुंडगिरी वाढून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी पोलीस प्रशासनच जवाबदार असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. वारंवार लेखी व तोंडी मागणी करून सुद्धा ठोस कारवाई होत नाही. गांजा विक्रेत्यांना पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे पाठबळ असल्याचा आरोप देखील गोरे यांनी केला आहे. गांजा विक्रेते व मद्य विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करून बंदोबस्त करावा अशी मागणी गोरे यांनी केली आहे.
केसनंद फाटा चाकीचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांचेशी संपर्क केला असतात यापूर्वी सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. वाघेश्वर नगर (गोरे वस्ती) परिसरात गांजा विक्री व मद्य विक्री होत असेल तर कारवाई केली जाईल असे सांगितले,