शिक्रापूर : प्रा.एन.बी.मुल्ला सर
तब्बल दोन वर्षांनंतर कोविडचे संकट दूर होत विद्यार्थ्यांचे शाळेत पुन्हा जल्लोषात स्वागत करून शिरूर तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सुरू झाल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी दिली.
शिरूर तालुक्यातील शाळांनी मुलांचे स्वागत वाजत-गाजत, गुलाब पुष्प आणि शैक्षणिक साहित्य देऊन केले. शिरूर तालुक्यात शाळांनी एकूणच जवळ जवळ ८0 टक्के विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती नोंदविल्याचे अनिल बाबर यांनी सांगितले. शिरूर तालुक्यातील अनेक शाळांना गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी भेटी दिल्या. भांबर्डे (ता. शिरूर ) येथील जि. प. प्राथमिक शाळा आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे स्वागत पुस्तके आणि शालेय साहित्य देऊन गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री अंबिका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चांगदेव पिंगळे, संचालक शिवाजी वीर, उरळगावचे सरपंच अशोक कोळपे, किरण गव्हाणे, कल्याणी जाधव, प्राथमिकचे मुख्याध्यापक विलास जासूद, प्रदीप देवकाते, सुरेश शेळके, लालासाहेब जगताप आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम गाडे यांनी केले तर बाळासाहेब देवकर यांनी आभार मानले.