शिक्रापूर : प्रा.एन.बी.मुल्ला
श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथे गेल्या दहा वर्षापासून राबवल्या जाणाऱ्या गणेश विसर्जन निर्माल्य संकलन उपक्रमाची व होडीतून नदीपात्रात गणरायाचे विसर्जन याची पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी पाहणी करून कौतुक केले.
श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी (ता.शिरूर) येथे प्रा.संदीप गवारे व प्रवीणकुमार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दहा वर्षापासून गणेश निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवला जात आहे. साधारण साडेआठशे किलो निर्माल्य जमा करण्यात आले व विघटनासाठी ते जमिनीत गाढण्यात आले. मेन चौक प्रतिष्ठान व ग्रामस्थ यांच्या वतीने गणेश विसर्जन निर्माल्य संकलनाचा उपक्रम पाहण्यासाठी यावर्षी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख व पोलीस उपअधीक्षक यशवंत गवारी यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी पुणे जिल्हा वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, जिल्हा कामगार आघाडीचे अध्यक्ष जयेश शिंदे, माजी उपसरपंच महेंद्र गवारे, हनुमान तरुण मंडळाचे अध्यक्ष बबन गवारी, उपाध्यक्ष बापू पवार, सोसायटीचे माजी उपाध्यक्ष रायचंद शिंदे, मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ, मेन चौक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते दिनेश राऊत, शामराव गवारी, महादेव पवार,घनश्याम गवारी, अॅड.संतोष गवारी, पोलीस पाटील शरद लोखंडे, के.टी.कोतवाल, तळेगाव ढमढेरे येथील व्यापारी वर्ग, शिक्रापूर पोलीस स्टेशनचा सर्व पोलीस स्टाफ, विठ्ठलवाडीचे ग्रामस्थ, पुणे शहरासह चंदननगर, तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, परिसरातील गणेश भक्त गणेश विसर्जनासाठी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावर्षी प्रथमच गणेश विसर्जनाच्या दिवशी भीमा नदीच्या पाण्यामध्ये पावसाच्या पाण्याची वाढ झाल्याने मेन चौक प्रतिष्ठानच्यावतीने होडीतून भीमा नदीच्या पात्रातील पाण्यात श्रीगणेशाचे विसर्जन करण्यात आल्याने गणेश भक्तांनी समाधान व्यक्त केले. डॉ.अभिनव देशमुख यांनी बोटींमधून गणपती विसर्जन करण्यास मदत करणाऱ्या चंद्रकांत गवारणे, बाळासाहेब गोंडावळे, गणेश आंबेकर या स्वयंसेवकांचा सत्कार केला. इतर गावातील मंडळांनी या उपक्रमाचा आदर्श घेऊन हा उपक्रम राबवावा. असे सांगून डॉ.अभिनव देशमुख यांनी सर्व गणेश भक्तांना शुभेच्या दिल्या.