नाशिकमध्ये दि.०५ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी ४९४ पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षणार्थीमध्ये मानाचा समजला जाणारा, रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनरचा मान पोलीस उपनिरीक्षक अभिजित काळे यांना मिळाला आहे.
जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास असल्यास अशक्य गोष्ट शक्य होते. हाच अनुभव पुणे जिल्ह्यामधील शिरूर तालुक्यातील निमोने येथील पोलीस उपनिरीक्षक अभिजित काळे यांना आला आहे. पदवीधर झाल्यानंतर अभिजित यांनी २०१७ मध्ये पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी परीक्षेची पूर्व आणि मुख्य परीक्षेत यश संपादन केले होते. मात्र वजन ९८ किलो असल्याने त्याला मैदान चाचणीसाठी मुकावे लागले होते. मात्र पीएसआय होऊन देशसेवा करण्याची जिद्द मनात असल्याने त्याने पुन्हा एकदा आपले नशीब आजमावत २०१९ मध्ये मुख्य परीक्षेत बाजी मारली.
रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनरचा मान : २०२० मध्ये कोरोनासारख्या जागतिक संकटामुळे आणि मराठा आरक्षणाच्या वादामुळे मैदान चाचणी रखडली होती. याच गोष्टीचा फायदा घेत अभिजित यांनी डायट प्लॅन फॉलो करत आपले वजन ३० किलोने घटवले. ज्या मैदानावरून त्यांना वजनामुळे माघारी फिरावे लागले होते. त्याच मैदानावर १०० पैकी १०० गुण मिळवत त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवले. विशेष म्हणजे ४९४ पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षणार्थी मध्ये मानाचा समजला जाणारा रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनरचा मानही त्यांना मिळला. हा मान मिळाल्यामुळे शिरूर तालुक्यातून व निमोणे परिसरातून अभिनंदनचा वर्षाव करण्यात आला.