वाघोली : प्रतिनिधी
मागील सहा दिवसांपासून पुणे-नगर महामार्गाखालून ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी केसनंद फाटा येथील मैदानात उघडयावर सोडण्यात आले आहे. ओढा वाहतो अशा प्रकारे केसनंद रोडवर पाणी वाहत आहे. त्यामुळे हे पाणी जमिनीत पाझरून नळामध्ये येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अधिकाऱ्यांबरोबरच लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष घालून प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
मागील सहा दिवसांपासून ड्रेनेजचे पाणी केसनंद फाटा परिसरात व रस्त्यावरून प्रचंड प्रमाणात वाहत आहे. केवळ विशिष्ट परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची योग्य काळजी घेवून इतर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे हे कितपत योग्य आहे अशा संतप्त प्रतिक्रिया केसनंद रोड परिसरातील नागरिकांमधून उमटत आहेत. संबधित अधिकाऱ्यांकडून मात्र उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत.
तात्काळ उपाययोजना करावी अन्यथा संबधित अधिकाऱ्यांना दुर्गंधीयुक्त पाण्यात बुडवण्यात येईल व त्यांना नळातून येणारे पाणी बॉटल्समध्ये भरून पिण्यासाठी देण्यात येईल. - अॅड. गणेश म्हस्के (मनसे, उपाध्यक्ष पुणे जिल्हा)
मी अजून बघितले नाही. उद्या येऊन बघतो. ड्रेनेज विभागाचा हा विषय असून आजूबाजूंच्या लोकांना नोटीसा दिल्या आहेत. मनापा सुविधा देत नाही त्यामुळे दंड का करता असे नागरिकांचे म्हणणे होते. त्यामुळे आम्ही दंडाचा विषय थोडा थांबवला होता.- अनिल ढमाले (वरिष्ठ आरोग्य अधिकारी)
गेली सहा दिवसांपासून केसनंद फाटा परिसरात मोठ्याप्रमाणावर दुर्गंधीयुक्त ड्रेनेजचे पाणी वाहत आहे. वाहणारे पाणी जमिनीत पाझरत असल्याने नळाला अतिशय घाण पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. करण थोरात (पुणे जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस)