निरा नदीतील कचरा प्रश्न ऐरणीवर,,
महाराष्ट्रातील तमाम भाविक श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरून जाता येता पवित्र ठिकाण म्हणून निरा नदीत रोजच स्नानासाठी थांबत आहेत. नदीतील कचरा पाहून कचरा नाईलाजlस्तव कचऱ्याकडे व त्यामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीकडे डोळे झाक करून स्नान करीत आहेत.
श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पूर्व तयारीसाठी पालखी सोहळा समितीसह अनेक मंत्री, महसूल, पोलीस, आरोग्य, जिल्हा परिषद, महामार्ग प्राधिकरण आणि पाटबंधारे खात्याचे अनेक अधिकारी येथे भेटी देत आहेत. सर्व काही दिसत असूनही निरा नदीतील कचऱ्याकडे आंधळ्याचे सोंग घेऊन त्यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे. महाराष्ट्र शासनाकडून नदी नाले सफाई शहरातच का येथे का नाही. त्यांना वैष्णवांच्या आरोग्याची काळजी नाही का? पालखी सोहळ्याला मिळणाऱ्या निधीपैकी २५ टक्के निधी अधिकाऱ्यांच्या दौऱ्यासाठी खर्च होऊन नुसते कागदी घोडे नाचवले जात आहेत. प्रत्येक वर्षी श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि श्री संत निरंकारी सत्संग मंडळ यांच्याकडून सेवाभावी वृत्तीने निरा नदीची मनापासून स्वच्छता केली जाते. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. परंतु ही फक्त त्यांचीच जबाबदारी आहे काय? आपण आपले घर व परिसर जसा स्वच्छ ठेवतो, आपण जसे स्वच्छ राहतो त्याप्रमाणे निरा नदी स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी नाही का?
श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन दिनांक ६ जुलै २०२४ रोजी निरा नगरीत आगमन होऊन विसाव्यानंतर पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करून श्री. दत्त घाटावर श्री. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र पादुकांना निरा नदीत पूर्वीपासून चालत आलेल्या प्रथेप्रमाणे स्नान घातले जाणार आहे. तसेच यादरम्यान महाराष्ट्र व संपूर्ण भारतातले लाखो वैष्णव (वारकरी) निरा नदीत स्नान करणार आहेत. नदीतील कचरा पाहून त्यांचे तोंडून आपल्याबद्दल काय शब्द निघतील तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर नदीतील घाणेरडेपणाबद्दल आपली काय कीर्ती पसरेल याचा विचारच न केलेला बरा.
श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पादुकांना आणि लाखो वैष्णवांना (वारकरी) कचरा आणि कचऱ्यामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यात स्नान घालून नदीत कचरा टाकणाऱ्यांना पुण्य लाभेल काय?