पुणे जिल्हा प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महाराष्ट्रतील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. तसेच या घोषणेनंतर कागदपत्रांची जमवाजमव महिलांकडून आणि त्यांच्या कुटुंबियांकडून केली जात आहे.अनेक जण रेशन कार्डमध्ये दुरुस्ती करुन घेत आहेत. तसेच रेशन कार्डमध्ये नावे लावणे किंवा कमी करण्याचं देखील काम करत आहेत.
या प्रक्रियेसाठी शासनाला अर्जदाराला शुल्क द्यावं लागतं. पण राज्य सरकारने हे शुल्क माफ केलं आहे.मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’योजनेसाठी महिलांना रेशनकार्ड मधील नावे कमी करणे व नवीन नाव लावणे प्रक्रिया ३१ ऑगस्ट पर्यंत निशुल्क करण्यात आल्याची घोषणा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. त्यामुळे शिंदे सरकारने आणखी एक गिफ्ट महाराष्ट्रातील महिलांना दिल्याची भावना आता व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांना रेशनकार्ड मध्ये नाव असणे आवश्यक आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी पुरवठा विभागाकडे माहेरच्या रेशन कार्ड मधून नाव कमी करणे आणि सासरच्या रेशनकार्ड मध्ये नाव लावण्यासाठी अधिक गर्दी होत आहे. याबाबत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी महिलांचे नाव कमी करणे आणि लावणे यासाठी लागणाऱ्या दाखल्याला आवश्यक असलेली शासकीय ३३ रुपये फी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यातील सर्व पुरवठा अधिकाऱ्यांना महिलांचे अर्ज पुरवठा विभागाने तातडीने स्वीकारून ते मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहे. यामुळे महिला वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.