कोरेगाव भीमा येथील एका व्यवसायिकाने खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे नवनाथ भंडारे, अमोल गव्हाणे, शांताराम सावंत, संतोष भंडारे, अजय यादव, किशोर खळदकर, संदीप अरगडे, जनार्धन वाळूंज, मामा सातव, सुधाकर कांतीलाल ढेरंगे, कांतीलाल रामचंद्र ढेरंगे या अकरा जणांवर गुन्हे दाखल झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत शिक्रापूर स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील किराणा व्यवसायिक किरण कुलकर्णी यांचा वैष्णवी सुपर मार्केट नावाने व्यवसाय असून कोरोना काळामध्ये व्यवसाय अडचणीत आल्यानंतर किरण कुलकर्णी यांनी काही खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतलेले होते,
तसेच किरण यांनी गावातील सुधाकर ढेरंगे व कांतीलाल ढेरंगे यांच्या सोबत भागीदारी मध्ये इमारत बांधलेली होती, बरेच दिवस खाजगी सावकारांना व्याज दिल्याने किरण अडचणीत आल्याने त्यांनी ढेरंगे यांच्या सोबत भागीदारीत असलेली सदनिका व गाळा विक्रीचा निर्णय घेतला, मात्र सदनिका व गाळा खरेदीसाठी व्यक्ती आल्यास ढेरंगे त्यांना सदर इमारत घेऊ देत नव्हते आणि झालेला व्यवहार मोडत होते,
मात्र ज्या खाजगी सावकारांकडून किरण यांनी पैसे घेतले ते सर्व जण त्यांना मानसिक त्रास देत दमदाटी करत असल्याने सावकार व ढेरंगे देत असलेल्या त्रासाला कंटाळून किरण सुरेश कुलकर्णी वय ४८ वर्षे रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे यांनी भिमा नदीच्या पाण्यात आत्महत्या केल्याचे समोर आले. घडलेल्या घटनेबाबत महेश सुरेश कुलकर्णी वय ४४ वर्षे रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व प्रतिक जगताप हे करत आहे.