विकास कामे गतीने पूर्ण करण्यासह योजना प्रभावीपणे राबवा - सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील 
                   आंबेगाव तालुक्यातील विद्युत वितरण विभाग, पाणीपुरवठा विभाग आदी विविध विभागांची विकासकामे गतीने पूर्ण करण्यासह कृषी विभागासह अन्य विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.
घोडेगाव येथे पंचायत समितीच्या हुतात्मा बाबु गेनू सभागृहात आंबेगाव तालुक्यातील विविध विभागांच्या आढावा बैठकीत श्री. वळसे पाटील बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे, तहसीलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, माजी सभापती कैलासबुवा काळे आदी उपस्थित होते.

यावेळी तालुक्यातील प्रत्येक विभागाचा आढावा घेण्यात आला. महावितरणची अनेक गरजेची कामे मंजूर आहेत. मात्र ही वेळेत होत नसल्याच्या शेतकरी व नागरिकांच्या तक्रारी असून अशा ठेकेदारांवर कठोर कारवाई करा, आवश्यकता असल्यास त्यांना काळ्या यादीत टाका. तालुक्यात ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची ११८ कामे मंजूर असून कामांना अधिक गती मिळावी यासाठी जिल्हास्तराव बैठक घेऊ, असे वळसे पाटील यांनी सांगितले.

तालुक्यात कोट्यवधी रूपयांची कामे सुरू आहेत. ही कामे लवकरात लवकर व दर्जेेदार करण्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. हा मंजूर निधी खर्च केला पाहिजे व झालेली कामे लवकर कार्यान्वित होतील हे पहावे, असेही ते म्हणाले.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी ड्रोन फिरत असल्याच्या बातम्या येत आहेत. पोलीस यावर लक्ष ठेवत असून, हे ड्रोन पाडण्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री खरेदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आले आहेत. लवकरच हे ड्रोन पाडले जातील. लोकांनी घाबरून जाऊ नये, असेही आवाहन त्यांनी केले.

एक रूपयात विमा योजना योजनेत तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग वाढणे आवश्यक असून कृषी विभागाने त्यासाठी गावस्तरावर सर्व ते प्रयत्न करावेत. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, पीएम कौशल्य विकास योजना आदी विविध योजना राबवण्यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. यासाठी लागणारी मदत केली जाईल असे श्री. वळसे पाटील यांनी सांगितले.

बैठकीस पोलीस विभाग, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती, कृषी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग आदी सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!