जांबूत प्रतिनिधी
चांडोह (ता शिरूर) येथिल चांडोह पानमंद मळा ते जांबूत शिव रस्त्याची दुरवस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे.शेतमाल वाहतूक करण्यासाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ये-जा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असलेला रस्ता चिखलमय झालेला आहे.रस्त्याची दुरवस्था दूर होण्यासाठी संबंधित विभागाने तात्काळ डांबरीकरण रस्ता करण्याची मागणी ग्रामपंचायत चांडोह व ग्रामस्थांकडून होत आहे.
सदर रस्त्याचे डांबरीकरण होण्यासाठी ग्रामपंचायत चांडोहच्या वतीने सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना लेखी पत्र देण्यात आले आहे.
या गावांना जोडणारा रस्त्याची दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या मार्गावरील दोन गावातील नागरीकांना उद्योग, व्यवसाय, शाळा, नोकरी, रुग्णालय महाविद्यालयीन शिक्षणासाठी चांडोह ,जांबुत मध्ये यावे लागते.वाहन चालवत असताना चालकांना कसरत करावी लागत आहे.या खड्डेमय झालेल्या रस्तावरुन जीव मुठीत घेत जीवघेणा प्रवास करावे लागत असून रात्रीच्या वेळी खड्डय़ाचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चांडोह गावात बिबट्याचा वावर असल्यामुळे रस्त्यावरून जाताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.नागरिक, वाहन चालकांची नाराजी दिसून येत आहे. संबंधित विभाग, लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून रस्ता दुरूस्त करण्याची मागणी केली जात आहे.मात्र गेली अनेक वर्षांपासून कोणताही स्थानिक पदाधिकारी याकडे लक्ष देत नसून, निधीची मागणी करूनही रस्ता दुर्लक्षित आहे.
लोकप्रतिनिधी मतासाठी गावाचा वापर करतात. मात्र निवडणुकीनंतर पूर्णपणे विकासाबाबत दुर्लक्ष करतात. अशी दबक्या आवाजात चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.