सुनील भंडारे पाटील
वाघोली (तालुका हवेली) येथील पाणी, वाहतूक कोंडी, सांडपाणी आणि मालमत्ता कर या समस्यांवरील उपाययोजनेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रावलक्ष्मी फाऊंडेशनच्या वतीने ‘रन फॉर वाघोली’ मॅरेथॉनचे आयोजन २५ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन सकाळी ६ वाजता वाघेश्वर मंदिराजवळील अभिषेक लॉन्स येथून सुरू होणार असून पुणे नगर रोड मार्गे लेक्सिकॉन शाळेच्या समोर दत्तकृपा पार्किंग पर्यंत होणार आहे.
यावेळी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिरूरचे खासदार अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार , सुजाता पवार आदिंसह वाघोली परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
मॅरेथॉनमध्ये वयानुसार चार गटांमध्ये नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे : युवक गट (१४ ते १८ वर्षे), तरुण गट (१८ ते २४ वर्षे), प्रौढ गट (२५ ते ४४ वर्षे), आणि ज्येष्ठ गट (४५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे). प्रत्येक सहभागीला ई-प्रमाणपत्र आणि टी-शर्ट देण्यात येणार आहे, तसेच प्रत्येक गटातील तीन महिला आणि तीन पुरुष विजेत्यांना सन्मानचिन्ह (ट्रॉफी) प्रदान केले जाईल.
वाघोलीतून करोडो रुपया महानगरपालिका सोयीसुविधा व्यवस्थित देत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असते याचा निषेध म्हणून सहभागी वाघोलीकरांनी आपल्या हक्कांसाठी सर्वांनी येताना एक रुपया सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एक एक रुपयांची जमा झालेली रक्कम महापालिकेला भेट दिली जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले असून यामुळे महापालिकेच्या वतीने नागरिकांना पुरेशा सोयीसुविधा पुरवाव्यात असा संदेश या मॅरेथॉनद्वारे दिला जात आहे.