महिनाभरात तब्बल नऊशे वाहनधारकांकडून साडेचार लाखाचा दंड वसूल
सुनील भंडारे पाटील
वाघोली (तालुका हवेली) हे वाहतूक कोंडीमुळे सतत चर्चेला असलेले पुणे नगर महामार्गावरील गाव म्हणून ओळखले जात आहे वाघोली मध्ये वाहतूक कोंडी होण्यास जेवढे प्रशासन जबाबदार आहे तेवढेच वाघोलीतील सुशिक्षित उच्चशिक्षित वाघोलीकर देखील जबाबदार आहेत ,
वाघोली मध्ये प्रामुख्याने खांदवे नगर, सोयरे गार्डन ,वाघेश्वर चौक आव्हाळवाडी फाटा,बकोरी फाटा, केसनंद रोड येथे सतत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते , यामध्ये बहुतांश ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास येत आहे अनेक नागरिक बिंदास्तपणे चौकामध्ये सिंगल तोडतात तर काही जण विरुद्ध दिशेने वाहने चालवतात, रस्ता आपल्याच मालकीचा आहे अशा थाटात अनेक जण रस्त्यावरच आपली वाहने पार्क करतात, ही काही वाहतूक कोंडीची मूलभूत कारणे समोर येत आहे .
एकीकडे लोणीकंद वाहतूक शाखेच्या वतीने गांधीगिरीच्या मार्गाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना गुलाब पुष्प दिले जाते तर नियमांचे पालन करण्याबाबत सूचना देत जनजागृती केली जाते, आपला व दुसऱ्याचं जीव सुरक्षित रहावा याची दक्षता बाळगावी अशा प्रकारचे वेगवेगळ्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यात येते. परंतु याकडे देखील वाघोलीकर सुज्ञ नागरिक दुर्लक्ष करतात
वाघोली मध्ये सकाळच्या सुमारास परिसरातील शाळेच्या हजारो बसेस रस्त्यावर येतात यादेखील अनेक वेळा विरुद्ध दिशेने जातात तर चौकामध्ये सिग्नलचे पालन देखील करत नाही, एकामागे एक अशा लाईन ने निघतात यामुळे देखील वाहतूक कोंडी होते. प्रवासी घेण्यासाठी रिक्षावाले बिंदासपणे कुठेही कशीही वाहने उभी करतात.
लोणीकंद वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मागील महिन्यात तब्बल नऊशे वाहन चालकांवरती दंडात्मक कारवाई करत साडेचार लाख दंड देखील वसूल केला आहे तर विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, सिग्नलचे पालन न करणे ,ट्रिपल सीट वाहन चालवणे, नो पार्किंग अशा पाचशे वाहनांवरती देखील दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे,
वाघोली चा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला असून अनेक सुशिक्षित, उच्चशिक्षित नागरिक नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने वाघोली परिसरात स्थायिक झाले आहेत यातील अनेक नागरिक दररोज पुणे शहर असेल रांजणगाव औद्योगिक वसाहत असेल येथे कामानिमित्त , व्यवसायानिमित्त ये जा करत असतात यांच्याकडून देखील आपल्या दुचाकी, कार मधून जाताना नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होताना दिसत आहे प्रत्येकाला जाण्याची घाई असल्याने वेडी वाकडे वाहने घुसवत सिग्नल तोडत स्वतःला उच्चशिक्षित सुशिक्षित समजणारे वाघोलीकर बिनधास्तपणे नियमांचे उल्लंघन करतात याचाच परिणाम वाहतूक कोंडीवर होतो आणि पर्यायाने वाहतूक कोंडी अधिक होते. त्यामध्ये अनेक वेळा ॲम्बुलन्स विद्यार्थ्यांच्या बसेस अडकून पडतात .
विदर्भ मराठवाड्यात जाण्यासाठी महत्त्वाचा असणारा पुणे नगर महामार्ग असल्याने यावरती विदर्भ मराठवाड्यात जाणाऱ्या हजारो बसेस संध्याकाळच्या सुमारास रस्त्यावर येतात त्या देखील हमरस्त्यावर कुठेही प्रवासी घेण्यासाठी उभ्या राहतात त्यामुळे त्यांच्या पाठीमागे वाहनांची लाईन लागून वाहतूक कोंडीत भर पडते. वाघोलीतील जीवघेणी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी, राजकीय व्यक्तींनी, जेष्ठ नागरिक पत्रकार यांच्यावतीने वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुढाकार घेत वरिष्ठांकडे पाठपुरावा केला याचीच दखल घेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी रस्त्याच्या कडेला पार्किंग केलेल्या दुचाकी वर कारवाई करण्यासाठी टोइंग व्हॅन उपलब्ध करून दिली त्याचा काहीसा दिलासा वाहतूक कोंडीतून मिळाला आहे, परंतु नुसतीच प्रशासनाने कारवाई करत किंवा प्रशासनाकडून अपेक्षा करण्यापेक्षा वाघोलीकरांनी पुढे येत वाहतूक नियमांचे पालन करत वाहतूक कोंडी होणार नाही याची जबाबदारी घेणे गरजेचे आहे.
अनेक वाघोलीतील उच्चशिक्षित सुशिक्षित नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून वाघोलीतील वाहतूक कोंडीचा गाजावाजा करत आहेत परंतु या सोशल मीडियाच्या माध्यमातून वाघोलीतील वाहतूक कोंडी वरील उपाय योजना, वाहतूक कोंडीबाबत जनजागृती करत, नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करणे तितकेच गरजेचे आहे. प्रशासनाकडे बोट दाखवत बसण्यापेक्षा सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे स्वतःपासून पालन करणे गरजेचे आहे, तरच वाघोलीतील वाहतूक कोंडी मधून दिलासा मिळू शकतो.