लोणी काळभोर प्रतिनिधी
गुन्हेगारास स्थानिक पोलिसाने मदत केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपासात पोलिसानेच गुन्हेगारास अप्रत्यक्षरित्या मदत केल्याचे समोर आल्याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कर्तव्यास असलेले पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी काढला आहे,
एका महिलेच्या डोक्यात दगड मारून, तसेच पतीवर पिस्तुलातून गोळीबार करून पसार झालेल्या दोन आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
थेऊर येथील लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांनी मुख्य आरोपी भरत जैद याला अप्रत्यक्षरित्या मदत केली आहे. ज्यावेळी हा गुन्हा घडला, त्यावेळी जैद घटनास्थळी हजर नव्हता, असे साक्षीदार सुदर्शन यशवंत आगळने व प्रतिक रमेश बिटे जबाब तपास टिपणांमध्ये नमुद करुन ती तपास टिपणे गुन्ह्याच्या कागदपत्रांत समाविष्ठ केली. परंतु, लोणी काळभोर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केलेल्या तपासादरम्यान आरोपी भरत जैद हा घटना घडली, त्यावेळी घटनास्थळी हजर असल्याचे सबळ पुरावे मिळाले आहेत.
पोलीस उपनिरीक्षक घोडके यांनी बारामती येथील तिरुपती हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करून भरत जैद हा बारामतीवरून पुण्याच्या दिशेने येताना त्याच्या इतर ७ साथीदारांसोबत काळ्या रंगाच्या फॉर्च्यूनर गाडीमध्ये आला नाही. तर, तो सुदर्शन आगळमे यांच्यासोबत त्यांच्याकडील शेवोरलेट गाडीमध्ये बसून आला होता. त्यानंतर जैद हा थेऊर मार्गे न जाता हडपसर, विश्रांतवाडी मार्गे गेला होता, असे निष्पन्न करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तपासादरम्यान भरत जैद हा गुन्ह्यात जप्त केलेल्या काळ्या रंगाच्या फॉर्च्यूनर गाडीमध्ये बसूनच सुपा पोलीस ठाणे येथून त्याच्या इतर सात साथीदार यांच्यासह निघाला होता.
त्यानंतर मोशी येथे थेऊर, केसनंद मार्गेच गेल्याचे सबळ पुरावे मिळाले आहेत. यावरुन पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांनी आरोपीस आप्रत्यक्षरित्या मदत केल्याचे निष्पन्न होत असल्याचे निलंबन आदेशात नमूद केले आहे. घोडके यांना निलंबन कालावधीत कोणतीही खाजगी नोकरी करता येणार नाही. तसेच घोडके यांना दररोज शिवाजीनगर येथील पुणे पोलीस मुख्यालय राखीव पोलीस निरीक्षक यांच्याकडे हजेरीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.