लोणी काळभोर- अनिकेत मुळीक
लोणी काळभोर (ता हवेली ) येथील तीर्थक्षेत्र
रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसरात दिनांक २६ जुन २०२२ रोजी राजर्षी
शाहूमहाराज यांच्या जयंतीनिमित्त बकुळ,कडुनिंब, चिंच, करंज, इलायची चिंच,
सुबाभूळ अशा जंगली वृक्षांचे रोपण करण्यात आले. या वेळी ग्रीन
फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, वृक्षमित्र मारुती काळभोर, जय हिंद
ग्रुप चे निखिल लोहारकर, सिद्धार्थ खंडागळे,नानासाहेब देशमुख, जीवन जाधव,
निरक बिका,राहुल कुंभार, किरण भोसले,अमित कुंभार,तसेच जय हिंद ग्रुप, ग्रीन
फाऊंडेशन,जनाई शिक्षण संस्था पुणे , गिरीश विभा ट्रस्ट उपस्थित होते.
राजर्षी शाहू महाराजांचा जन्म २६ जुन १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात
झाला. कागलचे जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे हे त्यांचे जन्मदाते वडील
राधाबाई ही त्यांची जन्मदाती माता. शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव
होते. छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे
शाहू अशा विविध नावांनी ते प्रसिद्ध होते. ते दहा वर्षांचे असताना
कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी यांची राणी आनंदीबाई यांनी १८ मार्च १८८४
रोजी त्यांना दत्तक घेतले व ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज
झाले.
इ. स. १८८५ मध्ये त्यांना शिक्षणासाठी राजकोट
येथे पाठविण्यात आले. तेथे त्यांनी चार वर्षे शिक्षण घेतले. त्यानंतर ते
कोल्हापूरला परतल्यावर धारवाड येथे शिक्षणासाठी गेले. तेथे सर एस.एम.
क्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभार, इतिहास, इंग्रजी भाषा इत्यादी
विषयांचे शिक्षण घेतले. धारवाड येथे शिक्षण घेत असतानाच लक्ष्मीबाई
यांच्याबरोबर एप्रिल १८९१ रोजी शाहू महाराजांचा विवाह झाला. शिक्षणक्रम
संपल्यानंतर वयाच्या विसाव्या वर्षी २ एप्रिल १८९४ रोजी शाहू महाराजांनी
कोल्हापूर संस्थानच्या राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली अशी माहिती मारूती
काळभोर यांनी या वेळी दिली.तर सूत्रसंचालन किरण भोसले यांनी व राहुल
कुंभार यांनी उपस्थितांचे आभार मानले.