शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
वाबळेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक व युवा साहित्यिक सचिन बेंडभर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वलिखित केलेल्या कवितांचे परिस स्पर्श पुस्तक नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे.
शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील युवा साहित्यिक सचिन बेंडभर यांनी आजपर्यंत विविध विषयांवर तब्बल पन्नास पुस्तके लिहिलेली आहेत. वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी सचिन बेंडभर यांनी प्रेरणा दिल्याने विद्यालयातील तब्बल ८५ बालकवींनी स्वलिखित कविता केल्या. या बालचमुंनी पक्षांची शाळा, मायेचा पदर, सृष्टी पर्यावरण, निसर्ग आपला मित्र, माझा बाप कष्टकरी, देश आहे महान आदी विषयांवर ८५ कविता 'परिसस्पर्श' या पुस्तकाच्या माध्यमातून सचिन बेंडभर यांनी प्रकाशित केल्याने बाल चिमुकले आनंदी झाले आहेत. परीसस्पर्श या पुस्तकाचे संपादक सचिन बेंडभर आहेत. पुस्तकाची प्रस्तावना साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक व तहसीलदार आबा महाजन यांनी केली आहे. वाबळेवाडीच्या मुलांचा कविता संग्रह प्रकाशित होणे हा शाळेच्या दृष्टीने एक ऐतिहासिक क्षण असल्याचे जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळेचे माजी मुख्याध्यापक व महाराष्ट्र शासन सल्लागार समितीचे सदस्य दत्तात्रय वारे यांनी अभिप्राय देताना सांगितले. साहित्यिक कुंडलिक कदम यांनी परिसरस्पर्श पुस्तकाचा परिचय करून दिला आहे. विद्यार्थ्यांनी रचलेल्या कविता संग्रहाचे पुस्तक उपक्रमशील शिक्षक प्रवीणकुमार जगताप यांना विद्यार्थ्यांनी व सचिन बेंडभर यांनी नुकतेच भेट दिले आहे.