शिनोली रवींद्र बोऱ्हाडे
मंचर (ता.आंबेगाव) येथील गोरक्षनाथ टेकडीवर मंगळवारी (ता.१९) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठींबा देण्यासाठी निष्ठावंत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा झाला
यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अँड.अविनाश राहणे, सहसंपर्कप्रमुख सुरेश भोर, संभाजीराव तांबे, पोपट शेलार, गणेश जमादार, राहुल गोरे, कलावती पोटकुले, विकी पारखी, देवराम गावडे, गुलाब शिंदे, यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
अशोक खांडेभराड यांनी आढळराव पाटील यांच्यावर टीका केली. ते म्हणाले “माझ्यासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील अनेक शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांचे खच्चीकरण आढळराव पाटील यांनी केले आहे. त्यांना फक्त खासदारकी मिळाली की बाकीच्यांचं देणं घेणं नव्हतं. मला, (स्व) माजी आमदार सुरेश गोरे व आशाताई बुचके यांनाही विधानसभेला पराभूत करण्यासाठी त्यांनी काम केले. हा इतिहास सर्वांना माहीत आहे.”
राजाराम बाणखेले म्हणाले “2004 पूर्वी आंबेगाव तालुक्यात तीन जिल्हा परिषद सदस्य व पाच पंचायत समिती सदस्य शिवसेनेचे निवडून आले होते. आढळराव शिवसेनेत आले. त्यानंतर झालेल्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत अविनाश राहणे, कल्पना आढळराव पाटील, अरुण गिरे व माझ्या मतदानात घट झाली आहे. आढळराव पाटील यांनी स्वार्थाचे राजकारण केले आहे.” सुरेश भोर म्हणाले “लवकरच या भागाचा दौरा उद्धव ठाकरे करणार असून सामान्य शिवसैनिकांची भेट घेणार आहेत. लवकरच दौऱ्याचे निमंत्रण देण्यासाठी मातोश्रीवर जाणार आहोत.” अविनाश राहणे, विजया शिंदे, शरद चौधरी, राम गावडे यांनीही आढळराव पाटील यांच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. शिवसैनिकांमध्ये उर्जा निर्माण करू अशी ग्वाही दिली.