शिक्रापूर : प्रा.एन.बी. मुल्ला
केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात येणारी केंद्रीय सामायिक वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा (नीट) भारतातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी विविध महाविद्यालयात तसेच कांही तालुक्याच्या ठिकाणी आज रविवार (दि.१७ जुलै) रोजी आयोजित करण्यात आली आहे. विविध परीक्षा केंद्रावर विद्यार्थी व पालकांची मोठी गर्दी असल्याचे चित्र होते.
राज्यातील व राज्याबाहेरील शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी केंद्रीय सामायिक वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा (नीट) आवश्यक करण्यात आली आहे. जीवशास्त्र, रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित ७२० गुणांची ही परीक्षा घेतली जाते. या परिक्षेत मिळणाऱ्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार एम.बी.बी.एस., बी. ए.एम.एस.,बी.डी.एस., बी.एच.एम. एस., बी.यु.एम.एस.,बॅचलर ऑफ फिजिओथेरपीसह अन्य कांही वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदवीला प्रवेश दिला जातो. आज रविवार (दि.१७ जुलै) रोजी आयोजित करण्यात आलेली परीक्षेची वेळ दुपारी २ ते ५.२० अशी एकाच वेळेस संपूर्ण देशात विविध केंद्रावर आहे. मात्र एकाच वेळी विद्यार्थ्यांची व पालकांची केंद्राच्या प्रवेशद्वारावर गर्दी होऊ नये म्हणून ११, ११.४०, १२.२० व १ अशी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेशपत्रावर रिपोर्टिंगसाठी वेगवेगळी वेळ दिला होती. आज पुणे जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रावर ही परीक्षा सुरळीत व शांततेत सुरू झाली.