शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
शिक्रापूर येथील कळमकर वस्ती येथून चोरट्यांनी भरदिवसा दरवाजाचे कुलूप तोडून सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास केला. शिक्रापूर पोलीस ठाण्यात यासंदर्भात भारत नारायण टेकाडे (वय २९ वर्षे, रा.कळमकर वस्ती, शिक्रापूर, ता.शिरूर, जि. पुणे, मूळ रा.बेराळा, ता.चिखली, जि.बुलढाणा) यांनी फिर्याद दिली आहे.
शिक्रापूर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार शिक्रापूर (कळमकर वस्ती) येथील शिवगंगा कॉम्प्लेक्स मध्ये ही चोरी रविवार (दि.१७ जुलै) रोजी दुपारच्या सुमारास झाली आहे. शिवगंगा कॉम्प्लेक्स मध्ये राहत असलेले भारत नारायण टेकाडे व अर्चना टेकाडे हे दोघेही रविवारी दुपारच्या सुमारास कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. सायंकाळच्या सुमारास घरी परतल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तूटल्याचे व दरवाजाची कडी उघडी असल्याचे आढळले. तातडीने घरात जाऊन पाहणी केली असता कपाट उघडे असल्याचे व सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले. कपाटाची पाहणी केली असता कपाटातील चार तोळे सोन्याचे दागिने व पाच हजार रुपये रोख असा सुमारे दोन लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचे आढळले. शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन आतकरे व पोलीस नाईक रोहिदास पारखे पुढील तपास करत आहेत.