सासवड बापू मुळीक
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेत माजी राज्यमंत्री तथा पुरंदर-हवेलीचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदे गटाशी घरोबा केला. पुणे जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नसल्याने किमान शिंदे गटाशी घरोबा केला तर राज्यपाल नियुक्त आमदारकी आणि फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्री पद भूषवल्याच्या अनुभवावर मंत्रीपद मिळेल या इच्छाशक्तीवरच शिवतारेंनी शिवसेनेशी प्रतारणा केली असल्याची चर्चा शिवसैनिकांसह राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पक्षाच्या विरोधात काम केल्याने आणि पक्षाची शिस्त मोडल्यानंतर विजय शिवतारे यांना शिवसेनेने बाहेरचा रस्ता दाखवत अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. शिवतारे यांचे शिवसेना सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याशी त्यांचे राजकीय वैमनस्य असून राज्यात महविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर ही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विरोधी भूमिका घेतली होती. शिवसेनेत बंडखोरी झाल्यावर विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदे गटाला समर्थन दिल्यानंतर त्यांच्यावर हकालपट्टी कारवाई शांत करण्यात आली आहे.
शिवतारे शिंदे गटात गेल्यामुळे विजय शिवतारे समर्थक आणि इतर शिवसैनिक यांच्यात वादाची ठिणगी पडण्याची शक्याता आहे, दोन्ही गटांनी वेगवेगळी भूमिका घेतल्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.
अशातच ज्यांना विजय शिवतारे यांची भूमिका मान्य नाही, त्यांना व्हॉट्सअॅप ग्रूपमधून वगळा, असे आदेश मिळले आहेत. तर पुरंदर तालुक्यातील गावागावांत बनवण्यात आलेल्या व्हॉट्स अॅप ग्रुपमधून शिवतारे यांच्या भूमिकेला बगल देणाऱ्यांना काढून टाकले जात असल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय देणार याकडे निष्ठावान शिवसैनिकांचे लक्ष असून त्यांनी 'वेट अँड वॉच'च्या भूमिका घेतली आहे.