सुनील भंडारे पाटील
वढु बुद्रुक(ता शिरूर) येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ म्हणजे स्वराज्याचे धाकले धनी, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत म्हणून समजले जाते,
ऐतिहासिक कालीन मृत्यूलाही न घाबरणारे, महिनाभर औरंग्याच्या अन्यायाला न डगमगता स्वामीनिष्ठ मित्र कवी कलश च्या साथीने हसत हसत मृत्यू पत्करणाऱ्या दैदिप्यमान इतिहासाची साक्ष सांगणाऱ्या स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचा अंत वढू- तुळापूर या ठिकाणी झाला,
धर्मपीठ, शक्तीपीठ, श्रीक्षेत्र वढू बुद्रुक या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, व जीवनाच्या प्रत्येक प्रसंगामध्ये सावली सारखा उभा असणारा राजांचा जिवलग मित्र कवी कलश अशा दोन समाध्या आहेत, या दोन समाध्या पाहून दोन मित्रांमधील प्रेम जागृत होते,राज्यातील दुसरी धर्म पंढरी समजल्या जाणाऱ्या वढू बुद्रुक या ठिकाणी आपल्या राजासमोर नतमस्तक होण्यासाठी अखंड हिंदुस्तान च्या कान्या कोपऱ्यामधून शिवभक्त,शंभू भक्त हजारोंच्या संख्येने येत असतात, वर्षभरामध्ये समाधी स्थळी, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, त्यामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती, राज्याभिषेक सोहळा, व इतर कार्यक्रमांचा समावेश असतो, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समिती, ग्रामपंचायत वढु बुद्रुक, समस्त ग्रामस्थ वढु बुद्रुक, पंचक्रोशी, शिरूर तालुका, पुणे जिल्हा, महाराष्ट्र राज्य, हिंदुस्तान, त्याचप्रमाणे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने अतिशय चांगल्या स्वरूपाचे नियोजन केले जाते.
समाधीस्थळावर सुरक्षा रक्षक, येणारा जाणाऱ्यांची नोंद केली जाते, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने दैनंदिन पहाटे पूजेचे आयोजन करण्यात येते,त्यामध्ये समाधी स्वच्छता, हार फुले, अगरबत्ती,शंभू वंदना, तोफांची सलामी, शंखनाद केला जातो, पूजेचा मान रोज वेगवेगळ्या गावातील, वेगवेगळ्या भक्तांना दिला जातो, दिवसभर शंभू भक्तांसाठी शिस्तीत दर्शन, व इतर सोयी सुविधा दिल्या जातात.