शिवछत्रपतींच्या पादुकांचे शिवनेरीहून पंढरपूर आषाढी वारीत झाले दिमाखात प्रस्थान

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील
           भागवत परंपरेच्या दृष्टीने आत्यंतिक महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पादुकांनी शिवजन्मभूमी शिवनेरीहून स्वराज्य राजधानी रायगडच्या दिशेने प्रस्थान केले . श्रीशिवछत्रपतींच्या पादुकांवर पवमान अभिषेक व रुद्राभिषेक झाल्यानंतर, मुख्य पुजारी सोपान दुराफे यांनी शिवाई देवीची महापूजा बांधून, महाद्वार पूजन झाल्यानंतर सोहळा रायगडाच्या दिशेने प्रतिकात्मक १ हजार पावले चालून पुढे वाहनाने मार्गस्थ झाला.
*आताच्या अनुकूलतेत स्वैराचार टाळण्याचा शिवरायांच्या पालखी सोहळ्याचा आग्रह*          
शिवनेरीहून निघालेल्या शिवरायांच्या या पादुका मंचर, खेड, पुणे मार्गे श्रीशंभुराजांच्या जन्मभूमी असलेल्या सासवड परिसरात विसावा . ज्येष्ठ शुद्ध द्वादशीस दुर्ग पुरंदरी शंभुराजांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करुन पुढे राजाभिषेक महोत्सवासाठी रायगडला पोहोचतील. राज्यात कोरोना संकटाने पुन्हा एकदा डोके वर काढल्यानंतर जल्लोषाच्या संख्येचा दुराग्रह सोडून सामाजिक बांधिलकी जपत केवळ १० च शिवभक्त शिवाई देवीच्या चरणांशी विसावलेल्या पादुका घेऊन, प्रस्थान पूजा करुन नारायणगाव मार्गे तालुक्यातून पुढे गेले. श्रीशिवछत्रपती पालखी सोहळ्याचे समन्वयक डॉ. संदीप महिंद गुरुजी याप्रसंगी बोलताना म्हणाले, कोरोनाचे बिकट संकट असतानाही आपल्या नियमित प्रथा-परंपरा जपताना गेली दोन्हीं वर्षी शिवरायांचा पालखी सोहळा रायगडाहून पायीच पंढरपूरला विठुरायाच्या भेटीस गेला होता. तेंव्हा शासकीय निर्बंधांचा सामना करत घरी थांबलेले, पायी चालीची परंपरा खंडित झालेले जर मोठ्या संख्येने आता बाहेर पडले तर ते सद्यस्थितीत योग्य होणार नाही. *प्रतिकूलतेत हाहाकार आणि अनुकूलतेत काहीसा स्वैराचार, हे अजिबातच योग्य नसल्याने साऱ्याच वारकऱ्यांनी यापासून बोध घेऊन शासनाच्या आरोग्यविषयक सल्ल्यांना व्यावहारिक जीवनात उतरविण्याचा आग्रह* त्यांनी याप्रसंगी  केला.          
आषाढी वारीच्या निमित्ताने भक्तिसागरात सामील होण्यासाठी निघालेल्या या शक्तिपरंपरेतील शिवरायांच्या पादुका दरवर्षी शिवनेरी, संग्रामदुर्ग, मल्हारगड, पुरंदर, रायरेश्वर असा प्रवास करून रायगडला जातात. राजाभिषेकापासून पुढील ५ दिवस रायगडावरच विसावा घेऊन ज्येष्ठ वद्य चतुर्थीला श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवतात. आषाढी वारी पूर्ण झाल्यानंतर पुढील अकरा महिन्यांच्या कायम वास्तव्यासाठी या पादुका शिवजन्मभूमीत परत येत असतात. *शिवछत्रपतींच्या पादुकांच्या पालखी सोहळ्याचे हे यंदाचे ८ वे वर्ष तर परंपरेचे २८ वे वर्ष आहे.*कोरोना महामारीचे शासकीय प्रतिबंधात्मक नियम गेल्या २ वर्षांसारखे कठोर नसले तरीही, शिवाई देवीच्या चरणांशी असलेल्या शिवछत्रपतींच्या पादुका घेऊन जाण्याची सेवेची संधी यावर्षी रुपेश घुले, संकेत दुट्टे, ओंकार अमृतकर योगऋषी सुधीर इंगवले यांच्या गटाला मिळाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, आवश्यक ते सर्व नियम-निर्बंध पाळून सोहळ्यास यशस्वी करण्यासाठी स्थानिक पातळीवर संदीप ताजणे, हर्षवर्धन कुर्हे, अक्षय कुटे, सागर मोरे, तेजस शिंदे, योगेश वाकचौरे यांनी सक्रीय सहभाग घेत परिश्रम घेतले. तर आवश्यक त्या परवानग्या मिळण्यासाठी पुरातत्व विभागाचे अधिकारी श्री. जंगले, श्री. मंगेश बोचरे तसेच शिवाई देवीचे पुजारी सोपानजी दुराफे, स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास जाधव, श्री. लोहकरे, उपवनसंरक्षक श्री. गौडा, वनविभागाचे श्री. नारायण राठोड आदि सर्व शासकीय व स्थानिक मंदिर संस्थानचे विश्वस्त आणि कुसूर ग्रामस्थ आदींचे सहकार्य लाभले.

 

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!