गुनाट एकनाथ थोरात
इनामगाव (ता.शिरूर) जिद्द ,चिकाटी आणि अभ्यासातील सातत्याच्या जोरावर काहींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात केली,तर काहींनी कुटुंबीयांचे स्वप्न साकारले . सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश येते , हे सनदी लेखापाल परीक्षेतील यशस्वितांनी दाखवून दिले आहे.कष्टाची तयारी ठेवल्यास आयुष्यात काहीही अशक्य नसते , असा संदेशच जणू त्यांनी आपल्या यशातून दिला आहे .
घरची पारंपारिक शेती आणि कौटुंबिक स्थिती हलाखीची... आई - वडील दोघेही हाडाचे शेतकरी आणि काळ्या मातीच्या सेवेतच समर्पित असलेले... एक भाऊ खासगी कंपनीत कामाला... घरात कुठलेही शैक्षणिक वातावरण नसल्याने चुलते, भाऊबंदांच्या घरी राहून, वेळप्रसंगी छोट्या - मोठ्या दुकानात मदतनीसाचे काम करून त्या जिद्दी तरूणाने सीए होण्याचे स्वप्न साकारले...!
शशिकांत दत्तात्रेय घाडगे असे या जिद्दी तरूणाचे नाव असून, सनदी लेखापाल पदासाठीची नूकतीच झालेली परीक्षा तो पास झाला. शिरूर तालुक्यातील इनामगाव येथील घाडगे मळ्यातील रहिवासी असलेल्या शशिकांत ने प्राथमिक शिक्षणाचे धडे या वस्तीवरीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत गिरविले; तर माध्यमिक शिक्षण गावातीलच न्यू इंग्लिश स्कूल मध्ये पूर्ण केले. पुढे अकरावी, बारावीसाठी त्याने श्रीगोंद्यातील महाराजा जिवाजीराव शिंदे विद्यालयात प्रवेश घेतला. पदवीची पहिली दोन वर्षे शिरूरच्या चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात तर शेवटचे वर्ष पुण्यातील एस. पी काॅलेज मधे शिकून तो पदवीधर झाला. त्याच दरम्यान सनदी लेखापालचे धडेही गिरविले आणि इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकौंटन्स ऑफ इंडिया (आयसीएआय) ने घेतलेल्या परीक्षेतून त्याने आपले सीए होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविले. २०१३ पासून तीन टप्प्यात झालेल्या या परीक्षेत खडतर परिश्रमातून त्याने हे यश मिळविले.
पारंपारिक शेती हाच व्यवसाय असलेले शशिकांतचे वडील दत्तात्रेय व आई सुनंदा हे हाडाचे शेतकरी असून, वडीलोपार्जीत जमीन कसूनच ते प्रपंचाचा गाडा पुढे ढकलत आहेत. शशिकांत यांचे थोरले बंधू कुलदीप खासगी कंपनीत कामाला असून, त्यांनी तसेच चुलते कैलास यांनी शशिकांतला सीए होण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. शिरूरला चुलत्यांकडे राहुन शशिकांत ने जिद्दीने सीए परीक्षेचा अभ्यास केला. या दरम्यान, चरितार्थासाठी व सीए परीक्षेच्या अभ्यासासाठीच्या खर्चाचा भार घरच्यांवर पडू न देता शिरूरमधेच छोटी - मोठी कामे केली. काही छोट्या दुकानांतही ते कामाला होते. पाच वर्षे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी त्यांनी क्लासही घेतले.
सनदी लेखापाल होण्यास शिरूर येथील सीए सुनिल यल्लोळ यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत ढवण, पोलिस उपनिरीक्षक तुषार भोर, शिवाजी आव्हाड, प्रा. योगेश भुजबळ, प्रा. सुधीर शिंदे, विकास चत्तर, किरण घाडगे या सहकाऱ्यांनीही वेळोवेळी प्रेरणा, प्रोत्साहन देताना सर्वतोपरी सहकार्य केले. इनामगाव परिसरात पहिला सीए होण्याचा मान शशिकांत घाडगे यांनी मिळविला असून, एका शेतकऱ्याचा मुलगा सीए झाल्याने त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.