शिक्रापूर : प्रा. एन.बी. मुल्ला
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेला प्रारूप विकास आराखडा रद्द करण्याची मागणी माजी मंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे.
माजी मंत्री बाळा भेगडे यांनी उपमुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केलेल्या मागणीनुसार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून दि.२ ऑगस्ट २०२१ रोजी क्षेत्राचा प्रारूप विकास आराखडा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्राद्वारे प्रसिद्ध करण्यात आला. या प्रारूप आराखड्यामध्ये प्रस्तावित आरक्षण, झोन, गाव रस्त्यांचा विस्तार, रिंग रोड, रेल्वे आदींचा समावेश करण्यात आला होता. सदरचा प्रारूप विकास आराखडा तयार होत असताना संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी न करता जीपीएस आणि सॅटलाईट द्वारे पाहणी करून आराखडा बनवण्यात आला. तसेच त्या ठिकाणच्या स्थानिक शेतकरी, ग्रामपंचायत व नागरिकांना विश्वासात न घेता तयार करण्यात आलेल्या आराखड्यामध्ये सुस्पष्टता नसल्याने शेतकरी व नागरिकांच्या मनात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. शेतकरी व नागरिकांचे मत विचारात न घेता तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यामध्ये रस्ते, रेल्वे, प्रस्तावित आरक्षण यांचे चुकीच्या पद्धतीने नियोजन केले गेले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी शेतकरी व नागरिकांच्या वतीने सदर आराखड्या विरोधात आंदोलने करण्यात आली होती. पुणे जिल्हा परिषदेकडून गावठाण विस्ताराबाबत ठराव करण्यात आला होता. परंतु याबाबतही कोणतीही कार्यवाही सदर आराखड्यामध्ये झालेली नाही. सदर प्रारूप विकास आराखडा तयार होत असताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असण्याची शक्यता आहे. तसेच सदर प्रारूप आराखडा बिल्डर धार्जिना असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांना उध्वस्त करणार आहे. त्यामुळे या विकासा आराखड्याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. तरी सदर दि.२ ऑगस्ट २०२१ रोजी प्रसिद्ध झालेला प्रारूप विकास आराखडा तातडीने रद्द करण्याची मागणी बाळा भेगडे यांनी केली आहे.