सासवड प्रतिनिधी बापू मुळीक
भारतीय निवडणूक आयोगाच्या ४ जुलैच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या २१ जुलैच्या आदेशानुसार सर्व मतदारांचे निवडणूक ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करून घेण्यात येणार आहे. त्यानुसार पुरंदर तालुक्यात प्रांताधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी प्रमोद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत असून मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
तरी तालुक्यातील सर्व मतदारांनी आपले मतदान ओळखपत्र आधार कार्डला लिंक करून घ्यावे. असे आवाहन पुरंदरच्या तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी रुपाली सरनोबत यांनी केले आहे.याचाच एक भाग म्हणून गुरुवार दि. १८ रोजी तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये निवडणूक ओळखपत्र आधार कार्डला लिंक करून घेण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात आली होती. त्याच प्रमाणे निवडणूक नायब तहसीलदार उत्तम बडे, लिपिक गणेश मखरे आदींनी सासवडच्या वाघिरे महाविद्यालय मध्येही युवक, युवतींना याबाबत माहिती देवून मतदान ओळखपत्र आधार कार्डला लिंक करून घेण्याचे आवाहन केले.
मतदान ओळखपत्राची आधार कार्डशी जोडणी ऐच्छिक.मतदाराने आपले निवडणूक ओळखपत्र आधार कार्डला लिंक केल्यानंतर संबंधित व्यक्तीचा आधारकार्ड नंबर गोपनीय ठेवण्यात येणार आहे. मतदाराला आपले मतदान ओळखपत्र आधारकार्ड ऑनलाईन द्वारे सुद्धा लिंकिंग करता येणार आहे. याबाबत माहिती गावचे तलाठी यानाही देण्यात आली असून तलाठी सर्वाना विस्तृत माहिती देतील. पुरंदरला ११ सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती देतानाच मतदान ओळखपत्राची आधार कार्डशी जोडणी सक्तीचे नसून ऐच्छिक आहे अशी माहिती तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी दिली आहे.