सासवड : प्रतिनिधी :बापू मुळीक
सासवड (ता पुरंदर) येथील वाघापूर फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला असलेले धोकादायक सुभावळीचे झाड खासगी प्रवासी जीपवर पडले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. रस्त्यावर मोठी वर्दळ असते. परंतु, रविवारी (दि. ७) पुरंदर हायस्कूल व कॉलेजना सुटी असल्याने या रस्त्यावर वर्दळ कमी होती. मात्र, जीपचे मोठे नुकसान झाले.
सासवड ते वाघापूरकडे जाणाऱ्या फाट्यावर ही घटना रविवारी दुपारी दोनच्या दरम्यान घडली. खासगी प्रवासी जीप (एमएच १२ पीए ९८२६) ही रस्त्याच्या कडेला उभी होती. जीपमध्ये ड्रायव्हर व प्रवासी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. रविवारी शासकीय सुटी असल्यामुळे जेजुरी व नारायणपूरला जाणाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. दुर्घटनेमुळे सासवडमध्ये वाहतूक कोंडी झाली होती..सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यात अनेक घटना घडल्या आहेत. रस्त्याच्या कडेला असणारी धोकादायक झाडे काढून टाकण्यासंदर्भात अनेकवेळा मागणी होऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
सासवड येथील अगोदरची घटना
धोकादायक, जुन्या, जीर्ण झाडांकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
महिन्यांपूर्वी कोंढवा रस्त्यावरील चांबळी गावच्या हद्दीतही असाच प्रकार घडला होता. वीर रस्त्यावरील पिंपळे गावच्या हद्दीतील रस्त्यालगतचा वटवृक्ष अंगावर कोसळून परिंचेतील जाधव कुटुंबीयातील नवदाम्पत्य आणि एका चिमुरडीचा अंत झाला होता. पुरंदर तालुक्यातील धोकादायक झाडांचे ऑडिट होऊन ही सर्व झाडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ काढून टाकावीत, अशी मागणी केली जात आहे...