शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
मुखई येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून हर घर तिरंगा अभियान अंतर्गत जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत ; त्यानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून घरोघरी तिरंगा लावण्याच्या अभियानाची जनजागृती यानिमित्ताने करण्यात आली. याप्रसंगी प्रशालेचे उपक्रमशील प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी *हर घर तिरंगा* या अभियानाचे आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे प्रत्येक भारतीयाच्या जीवनातील महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना सांगितले. सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभात फेरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपापल्या हातामधील वेगवेगळ्या बॅनरमधील विविध घोषणा देत गावामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची पार्श्वभूमी तयार केली. विद्यार्थ्यांच्या हातातील विविधरंगी आणि विविधढंगी छोटे-छोटे घोषणांचे बॅनर लक्ष आकर्षून घेत होते. तसेच प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हर घर तिरंगा या अभियानांतर्गत आवश्यक असलेले पत्रक गावात घरोघरी वाटप केले. विद्यार्थ्यांच्या विविध घोषणांनी परिसर दुमदमून गेला होता.