शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
महाराष्ट्रातील सध्याच्या आयुर्वेद महाविद्यालयांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी तसेच प्रत्येक जिल्ह्यात नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालये सुरू करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार जयंत आसगावकर यांनी केले.
पुणे येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात आयुर्वेद टीचर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित तीन दिवसीय राष्ट्रीय आयुर्वेद परिषदेच्या पुरस्कार समारंभात आमदार जयंत आसगावकर बोलत होते. या कार्यक्रमात आयुर्वेद शिक्षणातील उल्लेखनीय कार्यासाठी डॉ. श्रीराम सावरीकर व डॉ. पुरुषोत्तम पालेकर यांना जीवनगौरव पुरस्काराने तर डॉ. सुनंदा आणि सुभाष रानडे यांना ग्लोबल आयुर्वेद अॅम्बेसेडर पुरस्काराने गौरविण्यात आले. आयुर्वेदाला मुख्य प्रवाहातील आरोग्य सेवा म्हणून परत आणणे ही आयुर्वेदाच्या शिक्षकांची जबाबदारी असल्याचे मत निवृत्त लेफ्टनंट जनरल व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी केले. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राहुल सूर्यवंशी म्हणाले की आम्ही सरकारला पुण्यात राष्ट्रीय आर्युर्वेद संशोधन संस्थान स्थापन करण्याची विनंती करत आहोत ; जेणेकरून पुणे व जवळच्या परिसरातील लोकांना आयुर्वेदात संशोधन करत असताना मार्गदर्शन मिळेल. याप्रसंगी नामवंत अभ्यासकांनी आपले संशोधन प्रकल्प सादर केले. यातील सर्वोत्कृष्टांना पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. संदिप जाधव, डॉ. अरुण दुधामल, डॉ. दत्तात्रय लोढे, डॉ. गोविंद खटी, डॉ. मिलिंद निकुंभ, डॉ. मनोज चौधरी, डॉ. नितीन चांदूरकर, डॉ. नितीन वाघमारे, डॉ. योगेश कोटांगळे, डॉ. प्रदीपकुमार जोंधळे, डॉ. आनंद मडगुंडी, डॉ. अपर्णा सोले आदी उपस्थित होते.