शिक्रापूर : प्रा.एन.बी.मुल्ला
आरोग्य चांगले राहण्यासाठी समतोल आहार, व्यायाम, तणावाचे व्यवस्थापन व नियमित आरोग्य तपासणी आवश्यक असल्याचे प्रतिपादन आहारतज्ज्ञ डॉ. शिल्पा शिरोळे यांनी केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पौड रोड (कोथरूड) येथील मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय क्रिडा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात संतुलीत आहार व जीवनशैली या विषयावर आहारतज्ज्ञ शिल्पा शिरोळे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे होते. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी हॉकीपट्टू मेजर ध्यानचंद यांचा जीवनपट व त्यांनी हॉकीच्या माध्यमातून भारतासाठी केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला. तसेच चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम व योग्य आहार या बाबींकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक असल्याचेही प्राचार्य डॉ.झावरे यांनी सांगितले. राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त आयोजीत या कार्यक्रमात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची सुवर्ण कन्या व आंतरराष्ट्रीय खेळाडू अवंतीका नरळे हिचा प्राचार्य डॉ.बाळकृष्ण झावरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे क्रिडा विभाग प्रमुख शाम भोसले, उपप्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे, डॉ.योगेश पवार, महाविद्यालयातील सर्व विभागांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.योगेश पवार यांनी केले तर प्रा.अनिल दाहोत्रे यांनी सूत्रसंचालन केले.