शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
तळेगाव ढमढेरे येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तळेगाव ढमढेरे व परिसरामध्ये राष्ट्रध्वज जनजागृती अभियानाचे आयोजन केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत संपूर्ण देशभर शासकीय कार्यालय व घरे यांच्यावर राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार अनेक ठिकाणी राष्ट्रध्वज संहितेचे पालन करून राष्ट्रध्वज फडकवण्यात आले होते. पण स्वातंत्र्यदिनानंतर ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी तो उतरवण्यात आला नव्हता.
त्यानुसार भुजबळ विद्यालयातील इयत्ता आठवी व नववीतील विद्यार्थ्यांनी समिती स्थापन करून तळेगाव ढमढेरे व शेजारी असणाऱ्या वाड्या ,वस्त्या मध्ये राष्ट्रध्वज उतरवण्यासंबंधी जनजागृती करून सन्मानपूर्वक राष्ट्रध्वज खाली घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले .तसेच रस्त्याच्याकडेने व परिसरातील छोटे ध्वज गोळा करून राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची काळजी घेतली. या समितीमध्ये गायत्री कोल्हे, रोहित गायकवाड ,प्रणव भुजबळ ,मनीष भुजबळ ,यश आगरकर ,धैर्यशील वाघोले, पियुष नरके, वेदांत नरके, अथर्व धायरकर ,वेदांत दगडे, सुजल वडघुले, पूजा भुजबळ, प्रतिक भुजबळ, आर्यन नरके, कृष्णा खामकर, श्रेयस नरके, श्रद्धा दगडे, समीक्षा सादिगले, आर्शिन आतार, जैद शेख ,आयुष शेलार, ऋषी घाडगे, विदित फुलारी या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम व राष्ट्रभावना निर्माण करणाऱ्या या उपक्रमाचे ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव भुजबळ व पालकांनी कौतुक केले. या उपक्रमाचे नियोजन विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाचे क्रीडा शिक्षक किरण झुरंगे व सर्व शिक्षकांनी केले.