शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून ते सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाची (फेडरेशनची) सहविचार सभा फेडरेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
पिंपरी येथील नवमहाराष्ट्र विद्यालयात आयोजित या सभेला महाराष्ट्राच्या विविध ठिकाणचे पदाधिकारी उपस्थित होते. फेडरेशनचे सचिव एस. डी. भिरुड यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले व त्याला मंजुरी देण्यात आली. या सभेत अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कोषाध्यक्ष राजेंद्र लांडे, पुणे जिल्हा समन्वयक दादासाहेब गवारे, आप्पासाहेब शिंदे, संजय पवार आदिंनी शिक्षकांचे विविध प्रश्न उपस्थित केले. त्यावर अध्यक्ष व सचिवांनी मार्गदर्शन केले. या सभेत पुढील विषयावर चर्चा झाली - सरप्लस शिक्षकांना संरक्षण देणे, ६ वी ते ८ वी च्या शिक्षकांना बी. एड. वेतन श्रेणी देणे, अर्हताप्राप्त शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी त्वरीत लागू करणे, सर्वच शिक्षकांना जुनी पेन्शन योजणा लागू करणे, त्रुटींची पुर्तता करणाऱ्या शाळांना ताबडतोब अनुदान मिळावे, शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करणे, विविध थकित बिले ताबडतोब मिळावित, विविध प्रलंबित प्रस्तावांना मान्यता मिळावी, शिक्षकेत्तरांची पदोन्नती व भरती लवकर सुरू करण्यात यावी, विविध कार्यालयातील भ्रष्टाचाराला आळा बसावा यासह विविध मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचे ठरले. या सभेला महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शरदचंद्र धारुरकर, सोलापूर जिल्हा समन्वयक सचिन झाडबुके, सेवानिवृत्त प्राचार्य एस.पी.दोरगे आदि मान्यवर उपस्थित होते. या सभेचे नियोजन शिक्षक नेते गणपतराव तावरे यांनी केले.