स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना स्वतःला सिद्ध करण्याची क्षमता आत्मसात करा : किशोरराजे निंबाळकर

Bharari News
0
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
               स्पर्धा परीक्षेला सामोरे जात असताना स्वतःला सिद्ध करण्याची क्षमता आत्मसात करा तसेच पालकांनी मुलांवर अतिरिक्त दबाव न टाकता त्यांचे व्यक्तिमत्त्व स्वतंत्रपणे फुलू द्यावे हाच खरा यशाचा पासवर्ड असल्याचे मत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे विद्यमान अध्यक्ष आणि शिरूर तालुक्याचे भूमिपुत्र किशोरराजे निंबाळकर यांनी केले.  
तळेगांव ढमढेरे (ता.शिरुर) येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संकुलास आज किशोर राजे निंबाळकर यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज शिक्षण प्रसारक मंडळ परिवारातील पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचे दिमाखदार पद्धतीने स्वागत आणि सत्कार करण्यात आला.    संस्थेच्या विविध शैक्षणीक उपक्रमांची किशोरराजे निंबाळकर यांनी पाहणी केली. यावेळी अनौपचारिक चर्चेत त्यांनी वरील मत व्यक्त केले. शिक्षण प्रसारक मंडळ परिवारातील पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी इत्यादी घटकांशी मनमोकळा संवाद साधत राजेनिंबाळकर यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली.  यामुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तूभकुमार गुजर, मानद सचिव अरविंददादा ढमढेरे, विद्यमान संचालक महेश ढमढेरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक नवले, आर. बी. गुजर प्रशालेच्या प्राचार्या सुवर्णा चव्हाण आदींनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर साहेबांचा यथोचित सत्कार करुन स्वागत केले. 
याप्रसंगी बोलताना राजेनिंबाळकर पुढे म्हणाले की, स्पर्धेच्या आजच्या काळात कोणीही कुणाला कमी लेखता कामा नये. स्पर्धा परीक्षेला सामोरे जात असताना अभ्यासाबरोबरच व्यावहारिक शहाणपण आणि तर्कसंगत बुध्दिमत्ता खुप उपयुक्त ठरणारी आहे. कोणत्याही क्षेत्राचा सखोल अभ्यास आणि मेहनत घेण्याची तयारी असेल तर नक्की यश मिळेल असा आत्मविश्वास तरुणांमध्ये असण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. कला, वाणिज्य किंवा विज्ञान यांपैकी कोणत्याही विद्याशाखेला कमी लेखू नका असा कानमंत्रही किशोरराजे निंबाळकर यांनी दिला. महाविद्यालयातील माजी विद्यार्थिनी कल्याणी ढमढेरे आणि पालक असलेले सर्जेराव शिंदे यांनी विचारलेल्या विवीध प्रश्नांना त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत आपल्या अवतीभवतीचे सूक्ष्म ज्ञान असणे अतिशय आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिरूर तालुक्यातील न्हावरे गावातील बालपण ते आजपर्यंतच्या जीवन प्रवासातील विविध अनुभव किशोरराजे निंबाळकर साहेबांनी यावेळी कथन केले. कौस्तुभकुमार गुजर, अरविंददादा ढमढेरे , महेशबापू ढमढेरे यांच्याशी तालुक्यातील विविध मुद्यांवर त्यांनी चर्चा केली. चर्चेत शिरूर तालुक्यात राजकीय, सामाजिक घटना, प्रसंग आणि विविध पारंपरिक घडामोडीवर त्यांनी दिलखुलास चर्चा केली. याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ काँग्रेस नेते कौस्तुभकुमार गुजर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सहकार सेल उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र पोलीस मित्र संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र करेकर, सामाजिक कार्यकर्ते विजय घुले, रणजित तकटे, सुरेश ढमढेरे, प्राचार्य डॉ. अशोक नवले, मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण, सुनीता पिंगळे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!