रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
रांजणगाव गणपती (तालुका शिरूर) येथील शेळके वस्तीवर एक बेवारस लहान बाळ मिळून आले असुन सदर लहान बाळ रांजणगाव पोलीसांनी व वैद्यकीय अधिका-यांनी उपचार करुन सदर बालकाला बालकल्याण समितीच्या आदेशाने भारतीय समाजसेवा केंद्र , कारेगाव पार्क , पुणे येथे जमा करण्यात आले.
रांजणगाव येथील शेळके मळ्यात भास्कर लांडे यांच्या शेतात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या कैलास पांडुरंग दुंडे यांना हे बालक रडण्याचा आवाज आला असता ते त्या दिशेने गेले. त्या ठिकाणी त्यांना पाच महिन्याचे पुरुष जातीचे बालक आढळून आले. रांजणगाव पोलीसांना ही माहिती समजताच पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनानुसार उपनिरीक्षक सुहास रोकडे , पोलीस कर्मचारी गुलाब येळे , मोनिका वाघमोडे यांनी घटना स्थळी धाव घेऊन बालकाच्या आई-वडिलांचा व नातेवाईकांचा शोध घेतला माञ कुणीही मिळून आले नाही.त्यामुळे कैलास दुंडे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
त्याच प्रमाणे पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे यांनी बाळाला वैद्यकिय उपचार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करुन प्रकृती ची काळजी घेतली.
पोलीस कर्मचारी मोनिका वाघमोडे , विलास आंबेकर , पोलीस उपनिरीक्षक शुभांगी कुटे यांनी बाळाचे नामकरण ' वेदांत' असे केले. व सदर बालकाला बालकल्याण समितीच्या आदेशाने भारतीय समाजसेवा केंद्र , कारेगाव पार्क , पुणे येथे जमा करण्यात आले.