स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये सासवड न.पा.ला प्रथम पुरस्कार
घरोघरी वर्गीकरण केलेला ओला व सुका कचरा १०० टक्के संकलित
सासवड प्रतिनिधी बापू मुळीक
केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाद्वारे घेतलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२२ सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज आणि कचरामुक्त शहरांसाठीचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार सासवड शहराला मिळाला. सासवड शहराचा पुरस्कार केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री कौशल किशोर यांच्या हस्ते मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी स्वीकारला.पुरस्कार वितरण सोहळा दिल्लीमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला.
यावेळी पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप, माजी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, नगरविकास प्रधान सचिव मनोज जोशी, संयुक्त सचिव रूपा मिश्रा, सासवड नगरपालिकेचे आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण, अभियंता रामानंद कळसकर, समन्वयक राम कारंडे आदी उपस्थित होते. २५ ते ५० हजार लोकसंख्या विभागामध्ये सासवड शहरास अव्वल स्थान मिळाले ही आपल्या सर्वांसाठीच आनंदाची व अभिमानाची बाब आहे. तसेच स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशपातळीवर पुनःश्च अव्वल स्थान मिळवल्याबद्दल नगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी व सासवडमधील तमाम नागरिकांचे अभिनंदन आमदार संजय जगताप यांनी केले.
आमदारांची कौतुकाची थाप
आमदार संजय जगताप यांनी आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण आणि माजी नगरसेवक अजित जगताप, सासवड नगरपालिकेचे सफाई कर्मचारी यांचे मौलिक योगदान असल्याचे नमूद करीत आमदारांनी गौरवपूर्ण उल्लेख करीत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तसेच यापुढे सासवड नगरपरिषद ही विकासकामांच्या दिशेने वाटचाल करीत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हा क्षण तमाम सासवडकरांसाठी निश्चितच अभिमानास्पद व आनंददायी आहे.