शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत सत्य ,अहिंसा, समानता, न्याय या तत्त्वांच्या माध्यमातून स्वातंत्र्यप्राप्तीसाठी मार्गदर्शन करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती तसेच आपल्या दूरदर्शी वृत्तीने देशाला विकासाच्या मार्गावर नेऊन ठेवणारे भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर) येथील गुजर प्रशालेत आयोजित या कार्यक्रमात प्रशालेचे पर्यवेक्षक मोहन ओमासे, सांस्कृतिक मंडळाचे प्रमुख शिवाजीराव आढाव, प्रा. कुंडलिक कदम, रवींद्र सातपुते, नंदा सातपुते यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त प्रशालेत श्रमदानाचा उपक्रमही राबवण्यात आला. या अंतर्गत प्रशालेची स्वच्छता, शालेय परिसराची स्वच्छता करण्यात आली.
याप्रसंगी सुजल भुजबळ, संग्राम ढमढेरे, काजल भुजबळ, गीता ढमढेरे या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विषयी माहिती सांगितली तसेच प्रशालेच्या उपशिक्षिका नंदा सातपुते यांनी महात्मा गांधीजींचे राम भजनाचे गायन केले. या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण उपमुख्याध्यापिका सौ सुनीता पिंगळे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्तिकी सावंत या विद्यार्थिनीने केले तर नितीन माने यांनी आभार मानले.