शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
युवकांनी उद्योग - व्यवसायाकडे वळावे असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय संचालक प्रा.सुरेश उमाप यांनी केले.
जातेगाव बुद्रुक (ता.शिरुर) येथील गुरुदत्त ग्रामविकास प्रतिष्ठानच्या जिजामाता महाविद्यालयात उद्योजकता विकास व्याख्यान वाणिज्य विभागामार्फत घेण्यात आले. याप्रसंगी प्रा. सुरेश उमाप बोलत होते. उमाप यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की विद्यार्थ्यांनी स्वतः व्यवसाय निर्माण करत, दुसऱ्यांना नोकरी द्यावी, तसेच नवीन अंदाज स्विकारावा. उद्योजकांमध्ये त्यांनी अंबानी ,टाटा ह्या उद्याजकांचे उदाहरण देऊन त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. व्यवसाय निर्माण करणे ही काळाची गरज आहे. व्यवसायाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास होतो. व्यवसायामुळे बेकारी कमी होते तर व्यवसायाच्या माध्यमातून समाजाचा विकास होतो. व्यवसायामुळे त्वरित निर्णय घेतले जातात असेही त्यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.जी. इंगवले होते. या कार्यक्रमास समन्वयक गजानन पाठक, कार्यालयीन अधीक्षक आनंदा अंकुश , प्रा. प्रीती पवार ,प्रा. डॉ. विजय गायकवाड, प्रा.पूजा काटे, प्रा.अमोल धापटे ,प्रा. सीमा बांगर ,प्रा. सारिका जेधे, प्रा. योगिता इंगळे, प्रा. रोहीनी जराड , प्रा. अशोक शिंदे, आकाश शितोळे, दादा भागवत तसेच ८० विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय गायकवाड यांनी केले तर प्रा. प्रीती पवार यांनी आभार मानले.