शाळाबंदी निर्णयाविरोधात पुण्यात एकवटल्या ६५ संघटना

Bharari News
0
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
              वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या राज्यभरातील शाळा बंद करण्याचा घाट राज्य सरकारने घातला असून राज्य शासनाच्या या हालचालींना रोखण्यासाठी व विरोध करण्यासाठी राज्यभरातील ६५ संघटना एकवटल्या असून शासनाच्या या धोरणाला कडाडून विरोध होत आहे.      
शाळाबंदी विरोधात पुणे येथे या सर्व संघटना एकत्र आल्या असून  आंदोलनाला सामाजिक संघटनांचा सहभाग आहे. प्राथमिक ते पुक्टो सर्व शिक्षक संघटनांचे प्रमुख उपस्थित होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार दत्तात्रय सावंत, आम आदमी पार्टीचे नेते मुकुंद किर्दंत, माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे, शिक्षक भारती अध्यक्ष नवनाथ गेंड, शिक्षक संघाचे अध्यक्ष आंबादास वाजे, शिक्षक समितीचे अध्यक्ष उदय शिंदे,
शिक्षणतज्ज्ञ गीता महाशब्दे, अभ्यासक किशोर दरक, मालविका झा, परेश जयश्री मनोहर, 
सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सुलभा रघुनाथ, अॅक्टिव टीचर्स फोरम, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना,छात्रभारती, स्टूडेंट फेडरेशन ऑफ इंडिया, एन एस यु आय, नर्मदा बचाव आंदोलन, एम पुक्टो, महाराष्ट्र राज्य समाजवादी अध्यापक सभा, विद्यार्थी सेना, आप पालक संघटना, शिक्षकेतर कर्मचारी महामंडळ, महाराष्ट्र राज्य व्यवसाय मार्गदर्शन संघटना आदी एकूण ६५ संघटनांनी शिक्षण हक्क परिषदेत पुणे येथे आयोजित शाळा बंदी विरोधात भूमिका मांडली. महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समिती महाराष्ट्र या बॅनरखाली आंदोलन उभे राहणार आहे.शाळा बंदी विरोधात पुढील कृती-क्रायक्रम महाराष्ट्रभर घेण्याचे शिक्षण हक्क परिषदेत ठरले. या परिषदेत ठरल्यानुसार महसूल विभाग पातळीवर शिक्षण हक्क परिषदा आयोजित करण्यात येतील,   
 निर्धारित तारखेला राज्यातील सर्व गावांत गावकरी, शिक्षक आणि विद्यार्थी घंटानाद आंदोलन करून शासनाला इशारा देतील, ‘आमच्या शाळा बंद करू नका, शिक्षणाचा अधिकार हिरावून घेऊ नका‘, अशी आर्त विनवणी करणारे पत्र विद्यार्थी मुख्यमंत्री, राज्यपाल आणि राष्ट्रपती तसेच उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना लिहितील, शिक्षण बचाव कृती समितीच्या वतीने राज्यातील सर्व आमदार आणि खासदार यांना पत्र पाठवून लक्ष वेधले जाईल, शिक्षक संघटनांच्या वतीने राज्यात सगळीकडे स्थानिक आमदारांना निवेदन दिले जाईल, शाळा व्यवस्थापन समिति आणि ग्रामसभा ठराव संमत करून शासनाला आणि कोर्टाला पाठवण्यात येईल, स्थानिक वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्धीस दिल्या जातील आणि सोशल मीडियामध्ये कँपेन केली जाईल आदी ठराव करण्यात आले.
शाळा बंद करण्याच्या विरोधी आंदोलन जन चळवळ बनवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. शिक्षण देणार नाही तर मते देणार नाही, अशी भूमिका घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. शाळा बंदच्या विरोधात शिक्षण हक्क कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणे आणि समानतेसाठी शिक्षण ह्याची जोरदार मागणी करणे ह्यावर एकमत झाले. मुलांच्या शिक्षणावरील केला जाणारा खर्च हा गुंतवणूक नसून तो मुलभुत अधिकार असल्याने त्याबद्दल व्यापारी तत्वानुसार बघून चालणार नाही हे ठणकावून सांगण्यात आले. शिक्षण हक्क परिषदेचे समन्वयक भाऊ चासकर ह्यांनी इशारा दिला आहे की जो पर्यंत शाळा बंदीचे आदेश रद्द होत नाहीत, सरकारला ह्या आंदोलनाचे आवाज ऐकू येई पर्यंत हा लढा तीव्र करत, हे आंदोलन चालु ठेवले जाईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक भाऊ चासकर यांनी  केले. शिवाजी खांडेकर यांनी सूत्रसंचालन केले तर मधुकर काठोळे यांनी आभार मानले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!