वाचन हीच खरी संस्कृती आणि संस्कार : सुनीताराजे पवार

Bharari News
0
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला 
             वाचन हीच खरी संस्कृती आणि संस्कार असून वाचन संस्कृती जोपासणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्षा व पुण्यातील संस्कृती प्रकाशनाच्या संचालिका सुनिताराजे पवार यांनी केले.       
माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आज तळेगाव ढमढेरे येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयातील मराठी व ग्रंथालय विभाग यांनी आयोजित केलेल्या वाचन प्रेरणा दिन व अखंड वाचन स्पर्धा समारंभात प्रमुख अतिथी म्हणून सुनिताराजे पवार बोलत होत्या. समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक नवले होते. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ व विद्या सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेश ढमढेरे, संजय गांधी निराधार योजना शिरूर तालुका प्रमुख सचीन पंडीत, मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.संदीप सांगळे, ग्रंथपाल प्रा.सुमेध गजबे, डॉ.पराग चौधरी, डॉ.दत्तात्रय कारंडे, प्रा. मीनाक्षी दिघे आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. 
सुनिताराजे पवार पुढे म्हणाल्या की, काळाच्या ओघात आपल्या सर्वांचेच वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे. सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर आपल्या सर्वांसाठीच घातक ठरत आहे. त्यामुळे नव्या पिढीने वाचनाचा संस्कार बालपण व शालेय जीवनातून जोपासला तर खऱ्या अर्थाने आदर्श व्यक्तिमत्वे घडतील. सक्षम आणि सुदृढ समाज व कुटुंब व्यवस्थेच्या निर्मितीसाठी वाचन संस्कार गरजेचा आहे. माणसाचे मन आणि मेंदू प्रगल्भ बनवायचा असेल तर वाचनाशियाय पर्याय नसल्याचेही याप्रसंगी बोलताना सुनिताराजे पवार यांनी सांगितले. जगण्याचे आत्मभान जागृत होते ते वाचन संस्कृती मधूनच. त्यामुळे नव्या पिढीला प्रेरणादायी ठरतील असे साहित्यिक उपक्रम शाळा महाविद्यालयांत सातत्याने राबविणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. 
महेश ढमढेरे यांनीही याप्रसंगी शुभेच्छा दिल्या. वाचनातूनच खऱ्या अर्थाने समाज सक्षम होऊ शकतो. त्यामुळे समाजस्वास्थ्य चांगले ठेवायचे असेल तर सातत्याने छान आणि दर्जेदार साहित्य युवकांनी वाचणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. 
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. अशोक नवले यांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व विषद केले. वाचन हे बालपणापासून केले तर नक्कीच कोणतेही व्यक्तिमत्त्व आदर्श       घडल्याशिवाय राहणार नाही असेही  त्यांनी सांगितले. वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने महाविद्यालयातील मराठी आणि ग्रंथालय विभागाने आयोजित केलेल्या उपक्रमाचे प्राचार्य डॉ. नवले यांनी यावेळी कौतुक केले.  महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. संदीप सांगळे यांनी आपल्या प्रास्ताविकात मराठी व ग्रंथालय विभागातील उपक्रमशीलतेचा आढावा घेतला. वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने आज तळेगाव ढमढेरे महाविद्यालयात अखंड वाचन स्पर्धा आयोजित केली गेली. यामध्ये २७ विद्यार्थ्यांनी सलग तीन तास वाचन करून खऱ्या अर्थाने अब्दुल कलाम यांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्वाला सलाम केला. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार असल्याचे प्राचार्य डॉ. अशोक नवले यांनी याप्रसंगी जाहीर केले. ग्रंथालय विभागाने आजच्या वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले होते. अनेक विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रा.अविनाश नवले व प्रा. जनार्दन गिरमकर यांनी अखंड वाचन स्पर्धेचे परीक्षण केले. प्रा. डॉ. दत्तात्रय वाबळे, डॉ. सोमनाथ पाटील, डॉ. मनोहर जमदाडे, प्रा. केशव उबाळे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दत्तात्रय कारंडे यांनी केले तर प्रा. डॉ. रवींद्र भगत यांनी आभार मानले. 
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!