शिक्रापूर : प्रा.एन.बी. मुल्ला
न्हावरे येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालयात भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन "वाचन प्रेरणा दिवस" म्हणून साजरा करण्यात आला.
न्हावरे (ता.शिरुर) येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालयात प्राचार्य डॉ. शाहीद शेख व पर्यवेक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ.अविनाश कामठे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास असलेले डॉ. कलाम यांच्या व्यक्तिमत्त्व युवकांसाठी नेहमीच प्रेरणादायी आहे. डॉ. कलाम यांनी देशातील तरुण पिढीला आपल्या विचारांनी आणि कृतीने भारावून टाकले होते. भारत नक्कीच महासत्ता बनेल असा विश्वास त्यांनी प्रत्येक भारतीयांच्या मनात निर्माण केला होता. भारत एक महासत्ता म्हणून उदयास येईल आणि भारताची खरी ताकद तिथली तरुणाई असेल असा प्रेरणादायी आत्मविश्वासही डॉ.कलाम यांनी राष्ट्रपती असताना व्यक्त केला होता. डॉ.कलाम नेहमी म्हणायचे की चांगले पुस्तक हे शंभर मित्रांसारखे असते. म्हणून, शालेय मुलांनी डॉ.कलाम यांची पुस्तके वाचावीत, तसेच इतर साहित्य शक्य तितके वाचणे आवश्यक असल्याचे मतही या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षकांनी सांगितले. आजचा वाचन प्रेरणा दिवस श्री मल्लिकार्जुन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोबाईल व टीव्ही मुक्त साजरा करण्याचा संकल्प केला आहे. आज विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध पुस्तकांचे वाचन करून वाचन प्रेरणा दिन साजरा केला. या कार्यक्रमास सांस्कृतिक विभाग प्रमुख धनंजय शितोळे, ज्ञानेश्वर भोगावडे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.