सणसवाडी प्रतिनिधी
कान्हूर मेसाई (तालुका शिरूर) येथील आर्यन भरत पुंडे.इयत्ता आठवी. अभ्यासात हुशार आणि खेळातही. वडिलांचे छत्र १० वर्षांपूर्वी हरपले त्यावेळी तो होता ३ वर्षाचा.तेव्हापासून आईने कंबर कसली आणि पदरातील २ मुली आणि १ मुलगा यांना वाढविण्याचा व शिक्षण देण्याचा चंग बांधला.मुलांनीही आईच्या कष्टाची जाणीव ठेवून अभ्यास केला.पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत मुलगी नूतन यशवंत झाली.आर्यन पण पाचवीला शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी ठरला.आर्यनला खेळाची आवड म्हणून शालेय क्रीडा स्पर्धा जाहीर झाली आणि त्याच्यातला खेळाडू जागा झाला.शाळेच्या मैदानावर मित्रांसोबत कबड्डीचा सराव करताना हातावर पडला आणि उजवा हातच मनगटाच्या बाजूला मोडला.त्याची घायाळ अवस्था पाहून प्राचार्य अनिल शिंदे, क्रीडाशिक्षक ज्ञानेश्वर पुंडे ,प्रकाश चव्हाण,चंद्रकांत धुमाळ यांनी त्याला धीर देत प्राथमिक उपचार केले.मात्र नंतर शिक्रापूर येथील रक्षक हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना जवळपास पंचवीस हजार रुपयांचा खर्च आला.
आर्यनची आई लता ह्या एकटीच्या बळावर प्रपंचाचा गाडा चालवितात.हा आर्थिक भार पेलताना त्या हवालदिल झाल्या. मुलाच्या उपचारासाठी त्यांनी महिला बचत गटाकडून २०,०००-(वीस हजार रुपयांचे)कर्ज घेतले.ही बाब वर्गशिक्षक सिताराम मोहिते यांनी प्राचार्य अनिल शिंदे यांच्या कानावर घातली. वर्गशिक्षक मोहिते यांनी आर्यनच्या वर्गात मदतीचे आवाहन केले.प्रार्थनेच्या वेळी प्राचार्यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना मदतीचे आवाहन केली.आर्यनचे वर्गशिक्षक सीताराम मोहिते यांनी दोन हजार रुपये व वर्गातील मित्रांनी मिळून सात हजार आठशे सत्तर रुपये मदतनिधी गोळा केला. सर्व शिक्षक ,सेवक व इतर वर्गातील मुलांनी सतरा हजार सहाशे पंचाव्वन रुपये निधी गोळा केला.आज पंचवीस हजारहून अधिक रुपयांचा हा निधी आर्यनची आई, लता भरत पुंडे यांना विद्यालयात बोलावून त्यांच्याकडे सुपूर्द केला.
ह्यावेळी प्राचार्य अनिल शिंदे यांनी सांगितले की,आमच्या विद्यालयातील शिक्षक,सेवक व सर्व विद्यार्थी संस्कारक्षम असून शिक्षणाचा खरा अर्थ ते त्यांच्या कृतीमधून दाखवितात. समाजातील वंचित, गरीब घटकांचे अश्रू पुसताना माझे सहकारी व गुणवंत विद्यार्थी त्यांच्यातील संवेदनशीलतेचे दर्शन घडवितात याचा मला अभिमान वाटतो. त्यांची ही कृती खूप बोलकी आणि अंधारलेल्या समाजात दिशादर्शक व अनुकरणीय आहे.
समाजातील वंचितांना मदत करताना नेहमी अग्रेसर असणारे विद्या विकास मंडळाचे संचालक शहाजीअण्णा दळवी व प्राचार्य ,शिक्षक, सेवक यांच्या हातून हा निधी स्विकारताना लता भरत पुंडे यांच्या डोळ्यांत अश्रू तरारले होते.