लोणी काळभोर प्रतिनिधी
मतदारांना सोई साठी नगरसेवक आणि आमदारांनी जिल्ह्यात लांब पल्ल्याचे मार्ग सुरू करण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यांनी दिलेल्या पत्रानुसार पीएमपीकडून तातडीने मार्ग सुरू करण्यात आले. गेल्या काही महिन्यांत तब्बल ७८ मार्गांवर पीएमपीची सेवा सुरू आहे. मध्यंतरी राज्य एसटी कर्मचाऱ्यांनी संप केल्याने ग्रामीण भागात जवळपास चाळीस मार्गांवर पीएमपीने सेवा देण्यास सुरुवात केली होती. पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीत अशी सेवा सुरू झाल्याने पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरातील प्रवासी सेवेवर त्याचा ताण पडत असल्याचे दिसून येत होते.सेवा सुरू केलेल्या मार्गांवर उत्पन्न कमी आणि तोटा जास्त वाढत असल्याचे पीएमपीच्या वाहतूक विभागाला आढळून आले होते. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चही पीएमपीला करावा लागत होता. त्यावरून प्रवासी संघटना आणि संस्थांनी लांब पल्ल्याची सेवा सुरू करण्याच्या धोरणावर टीका केली होती.आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुणे, पिंपरी-चिंचवडमधील नगरसेवक आणि जिल्ह्यातील आमदारांनी ग्रामीण भागात सुरू केलेले मार्ग बंद करण्याचा निर्णय पीएमपीने घेतला आहे.
येत्या शनिवारपासून (२६ नोव्हेंबर) मार्ग बंद करण्यात येणार असल्याची माहिती पीएमपीकडून देण्यात आली. संचलनासाठी येत असलेला खर्च आणि मार्गांतून मिळणारे उत्पन्न यामध्ये मोठी तफावत आढळून आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान, मार्ग बंद करण्यात आल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात काही मार्गांवर जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
हे मार्ग बंद
स्वारगेट ते काशिंगगाव, स्वारगेट ते बेलावडे, कापूरहोळ ते सासवड, कात्रज सर्पोद्यान ते विंझर, सासवड ते उरूळी कांचन, हडपसर ते मोरगांव, हडपसर ते जेजुरी, मार्केटयार्ड ते खरावडे-लव्हार्डे, वाघोली ते राहुगाव, चाकण-शिक्रापूर फाटा, सासवड ते यवत या अकरा मार्गांवरील सेवा पहिल्या टप्प्यात बंद करण्यात येणार आहेत.
पुणे, पिंपरीमध्ये जादा गाड्या
ग्रामीण भागातील मार्ग बंद करण्यात आल्याने शनिवारपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये काही मार्गांवर जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. हडपसर ते मांजरी बुद्रुक, कात्रज ते हडपसर, कात्रज ते खराडी, पुणे रेल्वे स्थानक ते हिंजवडी माण फेज-३, शेवाळेवाडी ते कात्रज, कात्रज-गुजरवाडी ते भोसरी, पुणे रेल्वे स्थानक ते वडगाव, कात्रज ते जांभूळवाडी, मार्केटयार्ड ते पौडगांव, भोसरी ते हिंजवडी माण फेज-३ आणि भोसरी ते भेकराईनगर या अकरा मार्गांवर या गाड्या धावणार आहेत.