शिक्रापूर : प्रा.एन.बी. मुल्ला
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पौड रोड येथील मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्यात आला.
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व क्रीडा विभागाच्या वतीने मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या योगदानाचे स्मरण केले गेले व त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करीत अभिवादन केले. यावेळी प्राचार्य डॉ. जी.पी.सातव, डॉ.अरुण शिंदे, डॉ.शिवाजी शिंदे, डॉ.श्रीनीवास इपलपल्ली, डॉ.योगेश पवार, प्रा.संतोष मोरे, डॉ.अशोक शेळके, प्रा.गौरी मारणे, प्रा.अश्विनी जाधव, डॉ. महादू बागुल, डॉ. शोभा तितर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.अरुण शिंदे याप्रसंगी बोलताना म्हणाले की अनेकदा ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरांत कॉलेजांत येतात, विविध सामाजिक स्तरांतून ते बाहेरच्या ठिकाणी जातात. यामुळे नवीन ठिकाणी जुळवून घेताना अनेकदा अडचणी येतात. त्यावेळी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात ताण येतो; हा ताण कमी करून त्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ राहणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रयत्न करण्यात येत आहे. मन शांत करण्यासाठी फक्त ध्यानच करायला पाहिजे असं मुळीच नाही. अनेकांना आपले काही छंद जोपासताना, जसं की चित्र काढताना, नृत्य, कला, बागकाम, ट्रेकिंग, व्यायाम इत्यादी करताना वेगवेगळे अनुभव येतात. मन इतकं त्या गोष्टींमधे एकरूप होतं की बाकी काही विचार येत नाहीत. आसपासचं वेळेचं भानसुद्धा हरपून जातं. त्यामुळे मन शांत व्हायला मदत होते असेही त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.पी.सातव म्हणाले की राष्ट्रीय शिक्षण दिन दरवर्षी ११ नोव्हेंबर रोजी देशात साजरा केला जातो. हा दिवस भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. मौलाना अबुल कलाम आझाद यांनी १५ ऑगस्ट १९४७ ते २ फेब्रुवारी १९५८ पर्यंत देशाचे शिक्षण मंत्री म्हणून काम केले. भारताचे पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री आझाद यांनी देशाचा शैक्षणिक स्तर सुधारण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यकाळातच १९५१ मध्ये देशातील पहिली भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि १९५३ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना झाली. हा दिवस स्वतंत्र भारतातील शिक्षा प्राणालीचा पाया रचणाऱ्या अबुल कलाम यांचे महत्त्वपूर्ण योगदानाचे स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो. महाविद्यालयात राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये कोरोना नंतर सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रयत्न करण्यात येत असल्याचेही प्राचार्य डॉ. सातव यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज शिराळे याने केले तर डॉ.योगेश पवार यांनी आभार मानले.