सुनील भंडारे पाटील
सध्या ग्रामीण भागामध्ये गावोगावी यात्रा जत्रांची धामधुम जोरात चालू आहे, या उरसांमध्ये बैलगाडा शर्यत हे प्रमुख आकर्षण आहे, परंतु या बैलगाडा शर्यतीला शिरूर तालुक्यात गालबोट लागले असून तळेगाव ढमढेरे गावच्या यात्रेमध्ये बैलगाडा उतरवत असताना एका तरुणाला छातीत बैलाचे शिंग अचानक लागल्याने त्याचा मृत्यू झाला, वृषाल बाळासाहेब राऊत (वय 35 वर्ष रा, राऊतवाडी, शिक्रापूर, तालुका शिरूर जिल्हा पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे,
तळेगाव ढमढेरे (तालुका शिरूर) येथे ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्ताने बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते, तळेगाव ढमढेरे आणि कासारी या दोन गावांना जोडणाऱ्या शिवेवर असणाऱ्या घाटात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते, वृषाल राऊत हा तालुक्यामध्ये तसेच पंचक्रोशी मध्ये बैलगाडा शोकिन म्हणून प्रसिद्ध होता, बैल व गाडा आणलेल्या टेम्पो मधून उतरवताना बैलाचे शिंग वृषाल याच्या छातीमध्ये खोलवर घुसल्याने त्याला गंभीर दुखापत झाली, व त्याचा जागीच मृत्यू झाला, यात्रा जत्रा यामध्ये ग्रामीण भागामध्ये बैलगाडा शर्यत हे प्रमुख आकर्षण असून, बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर बैलगाडा शर्यतीवर असणाऱ्या लोकांचे प्रेम लोकांनी शर्यतीमधून दाखवले आहे, परंतु अचानक घडलेल्या या घटनेमुळे बैलगाडा प्रेमींवर शोककळा पसरली आहे, याबाबत योगेश राऊत यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी दिली असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली पो ह अमोल चव्हाण करत आहेत,