सुनील भंडारे पाटील
वाघोली (ता. हवेली) येथे रविवारी मध्यरात्री मनसे पदाधिकाऱ्याच्या चारचाकी गाडीची अज्ञातांकडून सिमेंटच्या विटांनी तोडफोड करत ‘मर्डर’ करण्याची धमकी देत दहशत माजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.याप्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून लोणीकंद पोलीस अज्ञातांचा शोध घेत आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मंगेश बाळासाहेब सातव हे मनसेचे वाघोली शाखा अध्यक्ष म्हणून काम पाहतात. वाघोली येथील काळूबाई नगर मध्ये कुटुंबासह राहतात. रविवारी (दि. २ एप्रिल) रोजी झोपेत असताना पार्किंगमध्ये अज्ञातांकडून “मंगेश सातव तुझा मर्डर करायचा” असे जोरजोरात ओरडून धमकी देत होते. दरम्यान मंगेश सातव यांची पार्किंगमध्ये असलेली चारचाकी गाडीची (एम.एच. १२ क्यू टी ४००१) सिमेंटच्या विटांनी फोडतोड करून अज्ञात दहशत माजवत होते. हा प्रकार बराचवेळ चालला होता,रविवारी (दि. २ एप्रिल) रोजी रात्रीच्या सुमारास घडला. सातव यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या पत्नीने त्यांना रोखले अन्यथा दुर्घटना घडली असती असे सातव यांनी सांगितले. घडलेल्या घटनेमुळे सातव कुटुंब भीतीच्या दडपणाखाली वावरत असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी सातव यांनी लोणीकंद पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस हल्लेखोरांचा तपास करत आहेत.
एकच गाडी फोडली :
पार्किंग मध्ये मंगेश सातव यांच्या चारचाकी गाडीसह काही दुचाकी गाड्या व एक चारचाकी गाडी होती. सातव यांच्या गाडीवर कव्हर झाकलेले असताना हल्लेखोरांनी केवळ एकच गाडी फोडली. हल्लेखोर सातव यांचे नाव घेवून जीवे मारण्याची धमकी देत होते. येरवडा पाठोपाठ आता वाघोलीत सुद्धा हल्लेखोर दहशत निर्माण करून पोलिसांना आव्हान देताना दिसून येत आहेत. पोलिसांनी वेळीच अशा दहशत मजविणाऱ्यांचा शोध घेवून कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
वाघोली मनसे अध्यक्ष मंगेश सातव यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर होणारे हल्ले आम्ही कदापि सहन करणार नाही. हल्लेखोरांना जशास तसे प्रतीउत्तर देण्यात येईल. पोलिस यंत्रणेने लवकरात हल्लेखोरांना शोधून काढावे. – अॅड. गणेश म्हस्के (उपाध्यक्ष म.रा. विधी विभाग, मनसे)