प्रतिनिधी सुनील पिंगळे
काळ बदलताना तो माणसाला मूळापासून बदलवतो. एक पिढी अशी होती, ज्यांनी छोटा ब्लॅक अॅन्ड व्हाईट टी वी घेण्यासाठी आपल्या आयुश्याची जमापुंजी पणाला लावली आणि एक पिढी अशी होती जिनं तोच टी व्ही रीमोट घेण्यासाठी भंगारात विकला. कधीकाळी टी व्ही आयुश्यातून एकदा घ्यायची गोष्ट होती.. आता लोकं कपडे बदलल्यासारखे टीव्ही मोबाईल बदलतात. उसवलेले शिवणे, मोडलेले जोडणे,जोडलेले जपणे, आणि जपलेले मरेपर्यंत टिकवणे हे यामागच्या पिढ्यांचे जगण्याचे साधे सूत्र होते..या पिढीने फक्त वस्तूच जपल्या नाहीत तर माणसंही जपली. आणि याचं कारण या पिढीच्या जीवनशैलीतच होतं.
म्हणजे असं की, हल्लीच्या पिढीला नं मागता मिळणार्या गोष्टी आधीच्या पिढीला प्रचंड संघर्षातून मिळावाव्या लागायच्या..त्यामुळे त्त्या गोष्टींची त्याना किंमत होती. त्या जपताना त्यांना जीव लावला जायचा..मात्र काळानं हल्लीच्या पिढीचा संघर्षच त्यांच्या आयुश्यातून काढून घेतला.
मला आठवतं की,साधं दुपारचं गारीगार घ्यायला पोरांकडं पैसे नसायचे..स्टंडवर लावलेल्या सायकलच्या डब्याच्या कोपर्यातून पडलेलं गारीगाराचं लाल पाणी तळव्यावर घेवून प्यायला झुंबड असायची..खिसाभर शेंगा आणून गारीगार वाल्याच्या तंगूसाच्या पिशवीत ओतल्यावर मिळणारं ते गारीगार दोन दोन जण आळीपाळीनं चोखून खायचे..गरीबी होती म्हणूनच दु:खाचं शेअरींग होतं. कॅडबरी हा प्रकार माहीत नसलेली पिढी भाजलेले चिंचोके, तासतासभर तोंडात घोळवून खायची.. चार लेमनच्या गोळ्यांसाठी शे पाचशे कडबा वाहणारी आणि फक्त चहा बटराच्या ईर्जिकीवर एकरभर जोंधळा उपटणारी पोरं अन्न वाया घालवतील ?
मला आठवतं की साध्या लाकडी बॅटसाठी रात्रीची ठिकी घेवून चिंचेच्या झाडावर चढून चिंचा उतरवायचो. फोडलेल्या चिंचेला जास्त दर असायचा म्हणून चोखपणे आरा काढून चिंचोके वेगळे काढून शेजारच्या बाजारात विकायचो. चार पैसे जास्त मिळायचे..तरीही पैसे कमी पडायचे.. मग गावाबाहेर ज्या झाडांना आयबाप नाही अशी करंजाची झाडं पहायचो. करंज्या झाडून, त्या फोडून विकायचो..आणि त्यातून घेतलेला बॅट बॉल जीवापाड जपायचो.
उन्हाळ्यात पैश्याची चणचण असायची आणि अवतीभोवती लहान जीवाला भुलवणारी खूप अमिशं असायची..जत्रा असायच्या.. फेरीवाले असायचे, कॅरम, क्रिकेट, असे वस्तूंसाठी पैसे लागणारे खेळ असायचे..मह्त्वाचं म्हणजे, निम्म्या किमतीत विकत घ्यायची पुढच्या वर्शासाठीची अभ्यासक्रमाची पुस्तकं असायची...त्याची तजवीज उन्हाळ्यातच व्हायची..खताच्या बैलगाड्या नाहीतर ट्रायल्या भरण्यासाठी पोरं गरागरा फीरायची..तीन चार जणांचा गट करून खोर्यानं उकिरडे उपसायची..ट्रायल्या भरल्या जायच्या..चार घमेली जास्तीची भरायचा मालकाचा अट्टाहास असायचा..जीव घामाघूम व्हायचा.. त्या पुन्हा रानात उतरवल्या जायच्या..अंग कळकटून जायचं..आईबापानी उपसलेले कष्ट आठवायचे.. पोरं लहान वयात अकालीच अशी प्रौढ व्हायची. पेरणी आधी बी बीवळ्याची कामं चालायची..चिपटया मापटयावर शेंगा फोडून चार आठाणे मिळायचे..पोरी चार घरी पापड लाटायला नाहीतर कुरडया घालायला जायच्या चार पापड मिळायचे. पोरं झेलणीनं चार घरी आंबे ऊतरवून चार दोन डजन आंबे बदल्यात मिळवायची..गुरांमागं वणवण फिरत,खांडं गोळा करत पोरांचा ऊन्हाळा ढोरमेहनीत जायचा..
माळानं झाडांचे खड्डे खणताना आणि डोक्यानं हंड्यामागून हंडे आणून पाणी घालताना मिळालेले दहा पैसे खर्च करताना मनात दहादा विचार यायचा.. आयुष्यभर फक्त ओझीच वाहणारा बाप आणि हयातभर केवळ धुणी भांडी करणारी आई कितीही फाटकी असली तरी अशा ढोरमेहनीतीतून त्यानी आपल्याला जगवलंय ही जानीव लेकरांना असायची.. कशासाठी किती हट्ट करावा याचं सणसणीत भान त्या काळातल्या उन्हाळ्यांनी त्या पिढ्यांना दिलं..म्हणूनच त्या पिढीनं जश्या सायकली भंगारात नं विकता खुंटीला आठवण म्हणून लटकवून ठेवल्या तशी म्हातारी माणसंही गळ्यातल्या ताईतासारखी उरात जपून ठेवली..
म्हणून मुलांनी मागणी केली का ती वस्तू लगेच देऊ नका त्या वस्तुसाठी काय संघर्ष करावा लागणार आहे यांची जाणीव त्याला झाली पाहिजे .....तेव्हा ख-या अर्थाने त्या वस्तुचं मोल त्याला कळाले..