गावाच्या विकास कामांसाठी सुशिक्षित तरुणांनी राजकारणात लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सहकार मंञी दिलीप वळसे पाटील यांनी केले. पिंपरी दुमाला (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी शरद नानाभाऊ खळदकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांचा सत्कार करताना ते बोलत होते.
मावळत्या उपसरपंच जयश्री संदीप सोनवणे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने शरद खळदकर यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज केला होता. या पदासाठी शरद खळदकर यांचा एकमेव अर्ज आल्याने ग्रामसेवक ढसाळ यांनी ही निवड बिनविरोध झाली असल्याचे घोषित केले. यावेळी सरपंच महेंद्र डोळस यांच्यासह गावातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
वळसे पाटील यांनी सत्कार केला या प्रसंगी माजी आमदार पोपटराव गावडे , शिरुर-आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील , बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार , राजेंद्र गावडे यांसह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येंने उपस्थित होते. दरम्यान सहकार मंञी दिलीप वळसे पाटील यांनी श्रावणी सोमवार चे औचित्य साधून पिंपरी दुमाला येथील सोमेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन मंदिराच्या कामाची पाहणी केली.