घोळक्यात भांडणे करण्याचे प्रकार विद्यार्थ्यांकडून वाघोलीमध्ये वाढले
भर रस्त्यात जमा होतो विद्यार्थ्यांचा घोळका ; पोलीस प्रशासन, पालक व शिक्षकांनी लक्ष देण्याची गरज
वाघोली प्रतिनिधी सोमनाथ आव्हाळे
वाघोली (तालुका हवेली) बाईफ चौक व पुणे-नगर रोडवर शाळा सुटल्यानंतर सायंकाळी घोळक्यात भांडणे करण्याचे प्रकार मागील अनेक दिवसांपासून घडत असून भर रस्त्यामध्ये जवळपास ५० ते १०० विद्यार्थ्यांचा घोळका जमा होत असल्याने भांडणाच्या नादात रस्त्याने अपघात किंवा जीवघेणी घटना घडण्याची शक्यता वाढली आहे. पोलीस प्रशासन, विद्यार्थ्यांच्या पालकांनी व संबंधित शाळेच्या शिक्षकांनी याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.
वाघोलीतील गुन्हेगारीचे प्रमाण हळूहळू वाढत असताना पोलिसांकडून सातत्याने गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कोयता, तलवार बाळगल्याप्रकरणी अनेक तरुणांवर पोलिसांनी कारवाई करून गुन्हे दाखल केले असले तरीसुद्धा दहशतीसाठी अनेक तरुण छुप्या पद्धतीने हत्यारे बाळगत असतात. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या वाघोलीमध्ये तरुणाईकडून शिल्लक कारणावरून मारामारी करण्याचे प्रकार सातत्याने घडताना दिसत आहेत.
याच गुन्हेगारीचे लोट आता शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये पसरल्याचे पहावयास मिळत आहे. शाळेतील किरकोळ कारणांवरून मारामारी, शिवीगाळ, भांडणे करण्याचा प्रकार हळूहळू वाढताना दिसत आहे. सायंकाळी शाळा सुटल्यानंतर पुणे-नगर रोडवर किंवा बाईफ चौकामध्ये विद्यार्थ्यांचा घोळका आणि भांडणे असा प्रकार सातत्याने पहावयास मिळत आहे. शुक्रवारी (दि.१८) १०० ते १५० विद्यार्थ्यांचा घोळका जमा होऊन तुफान भांडणे सुरु असल्याच्या प्रकार वाघोलीतील महामार्गावर व बाईफ चौक येथे जागरूक नागरिकांना लक्षात आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना कळविले. विद्यार्थ्यांचा घोळक्यातील विद्यार्थी सैरभैर महामार्गावर तसेच बाईफ रोडवर पळत होते. पळत रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडे त्यांचे दुर्लक्ष होत होते. नागरिकांनी सातत्याने फोन करून २० ते २५ मिनिटांच्या अंतराने आलेले पोलीस पाहून विद्यार्थ्यांनी देखील धूम ठोकली. काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
घोळक्यात भांडणे करण्याचा प्रकार अनेक दिवसांपासून घडत आहे. प्रामुख्याने ८ वी ते १० वीचे विद्यार्थी यामध्ये सहभागी असतात. विद्यार्थी असल्याकारणाने नागरीकही त्याकडे अनेकदा दुर्लक्ष करीत असतात. विद्यार्थ्यांच्या भांडणानंतर विद्यार्थीच ओळखीच्या बाहेरील तरुण मुलांना बोलवून आणखी भांडणे, मारामारी करीत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या घोळक्यातील भांडणात जीवघेणी घटना किंवा अपघात घडण्याची दाट शक्यता असल्याने पोलीस प्रशासन, विद्यार्थ्यांच्या पालकांनी व संबंधित शाळेच्या शिक्षकांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
शालेय जीवनातच गुन्हेगारी प्रवृत्तीला मिळत आहे खतपाणी
पुण्यात कोयता संस्कृती दिवसेंदिवस वाढत आहे. कोयत्या गँगच्या दहशतीने पुणेकर धास्तावले असून त्यांना पोलिसांचीही भीती वाटेनाशी झाली आहे. वाघोलीत पोलिसांनी विशीतले तरुण व अल्पवयीन मुलांकडून देखील कोयते जप्त केले आहेत. आता तर ही संस्कृती शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये पसरु लागली आहे. क्षुल्लक कारणावरुन विद्यार्थ्यांमध्ये होत असलेल्या मारामाऱ्यांच्या घटना सातत्याने घडत आहेत. शालेय जीवनातच गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळत असल्याने भविष्यात कुख्यात गुन्हेगार तयार होऊन टोळी युद्धाचा भडका देखील उडू शकतो. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे तसेच शाळांमधील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्याचे आवाहन पोलिसांसमोर असणार आहे.